चेन्नई, २७ जानेवारी २०२४ : महाराष्ट्राची वेटलिफ्टर आरती ताटगुंटी आणि आंध्र प्रदेशची ए व्ही सुश्मिता यांनी अनुक्रमे मुलींच्या ४९ किलो आणि ५५ किलो गटात सुवर्णपदक पटकावत नवा राष्ट्रीय युवा विक्रम प्रस्थापित केला. तामिळनाडू येथे सुरू असलेल्या सहाव्या खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२३मध्ये हरयाणाने कुस्तीत एकाच दिवशी पाचपैकी चार सुवर्णपदके जिंकून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर ४९ किलो वजनी गटात आरती आणि महाराष्ट्राचीच सौम्या दळवी आणि आसामची पंचमी सोनोवाल यांच्यात अटीतटीची चुरस पाहायला मिळाली. आरतीने स्नॅचमध्ये ७५ आणि क्लीन अँड जर्कमध्ये ९५ गुणांसह एकूण १७० किलो वजन उचलून स्नॅच, क्लीन अँड जर्क मध्ये नव्या विक्रमाची नोंद केली. रौप्यपदक विजेत्या सोनोवालने तिच्या मागील कामगिरीत सुधारणा केली आणि त्यामुळे आरतीला कडवी टक्कर मिळाली. त्यामुळे आरतीने अधिक भार उचलून राज्यासाठी वेटलिफ्टिंगमधील दुसरे सुवर्णपदक निश्चित केले.
सोनोवालने मागील पर्वात सुवर्णपदक जिंकले होते आणि यंदा क्लीन अँड जर्कच्या शेवटच्या प्रयत्नात तिने ९७ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला दुखापत झाली. तिला स्कॅनसाठी त्वरित रुग्णालयाने नेण्यात आले. सुश्मिताने ५५ किलो वजनी गटात १७३ किलो वजन उचलून नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला आणि सुवर्णपदक नावावर केले.
कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी हरयाणाने वर्चस्व गाजवले आणि त्यांनी पदकतालिकेत मोठी झेप घेतली. मोनिका ( ४६ किलो ), नेहा ( ५७ किलो ), अमरजीत ( मुले ५१ किलो ग्रीको रोमन) आणि विनय ( मुले ९२ किलो फ्रीस्टाइल) यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर आरामात विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले. हरयाणाच्या मुलींनी हॉकीत सलग पाचवे विजेतेपद पटकावताना मध्य प्रदेशवर १-० असा विजय मिळवला.
महाराष्ट्राने पदकतालिकेत अव्वल स्थान कायम राखले असून त्यांच्या यादीत आणखी चार सुवर्णपदकांची भर पडली आहे. वेटलिफ्टर महादेव वडार ( मुले ६७ किलो), कुस्तीपटू समर्थ ( मुले ६० किलो ग्रीको रोमन ) आणि जलतरणपटू ऋतुजा राजाज्ञा यांनी सुवर्णपदक मिळवले.
राजाज्ञा ही SDAT एक्वाटिक कॉम्प्लेक्समधील खेलो इंडिया युवा स्पर्धेमधील २९.१८ सेकंदाच्या वेळेसह ५० मीटर फ्रीस्टाइल शर्यत जिंकून जलद जलतरणपटू ठरली. आसामच्या जान्हबी कश्यप आणि सुब्रांशिनी प्रियदर्शिनी यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. मुलांमध्ये सर्वात वेगवान जलतरणपटूचा मान आसामच्या जनंजॉय ज्योती हजारिकाला मिळाला. त्याने २५.५३ सेकंदाची वेळ नोंदवली. महाराष्ट्राच्या सलील भागवत आणि गुजरातच्या हीर पित्रोदा यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले.
त्याआधी, केरळची सायकलपटू अलानिस लिली क्युबेलिओने मुलींच्या ६० किमी वैयक्तिक रोड शर्यतीत विजेतेपद पटकावले, तर चंदीगडच्या जय डोग्राने ईसीआरमध्ये ३० किमी टाइम ट्रायलमध्ये मुलांमध्ये अव्वल स्थान पटकावले.
गुरु नानक कॉलेज शूटिंग रेंजमधून पश्चिम बंगाल आणि तेलंगणा यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकले. पश्चिम बंगालच्या अश्मित चॅटर्जीने १० मीटर एअर रायफलमध्ये २५०.९ च्या अंतिम स्कोअरसह सुवर्णपदक जिंकले आणि हरियाणाच्या हिमांशूने (२५०.६) आणि राजस्थानच्या मानवेंद्र सिंग शेखवंतने (२२७.६) अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.
२५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात तेलंगणाच्या के तनिष्क मुरलीधर नायडूने १९ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. आंध्र प्रदेशच्या मुखेश निलावल्ली (१८) आणि महाराष्ट्राच्या स्वराज भोंडवे (१६) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. (KIYG 2023: Weightlifters Aarti Tatgunti, AV Sushmita win gold with national record)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्ड टेबल टेनिस स्टार कंटेंडर गोवा २०२४ : भारताच्या श्रीजाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, मनिकाचा पराभव
जामनेरमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी कुस्ती दंगल