येत्या २ दिवसांत इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा अंतिम सामना रंगणार आहे. पहिला क्वालिफायर सामना जिंकत चेन्नई सुपर किंग्ज संघाने सर्वात आधी अंतिम सामन्यात धडक मारली होती. त्यानंतर बुधवार रोजी (१३ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुसरा क्वालिफायर सामना झाला. कोलकाताने शेवटच्या षटकात ३ विकेट्सने हा सामना जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. परंतु या विजयानंतरही कोलकाताच्या ताफ्यात मात्र चिंतेचे वातावरण आहे. कारण त्यांचा कर्णधार ऑयन मॉर्गन याच्या फलंदाजीला गंज लागला आहे.
दिल्लीने दिलेल्या १३६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या सलामीवीरांनी संघाला भक्कम सुरुवात करून दिली. वेंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागिदारी रचली. परंतु त्यांच्या विकेट गेल्यानंतर मधल्या फळीत मॉर्गनकडून कर्णधार खेळीची अपेक्षा होती. परंतु सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मॉर्गन ३ चेंडूंचा सामना करताना खातेही न उघडता बाद झाला. त्याला एन्रिच नॉर्किएने त्रिफळाचीत केले.
ही त्याची यंदाच्या हंगामात शून्यावर बाद होण्याची चौथी वेळ होती. यासह बरेचसे लाजिरवाणे विक्रम त्याच्या खात्यात जमा झाले आहेत. मॉर्गन हा कोणत्या आयपीएल हंगामात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा कर्णधार बनला आहे. हा नकोसा विक्रम करणारा तो आयपीएल इतिहासातील पहिला आणि एकमेव कर्णधार आहे.
इतकेच नव्हे तर, दुसऱ्या क्वालिफायरमधील कोलकात्याचा प्रतिस्पर्धी दिल्लीविरुद्धच शून्यावर बाद होण्याची ही त्याची तिसरी वेळ होती. २९ एप्रिल रोजी अहमदाबाद येथे दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात तो पहिल्यांदा शून्यावर पव्हेलियनला परतला होता. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी शारजाहमध्ये झालेल्या सामन्यातही २ चेंडूंचा सामना करताना तो एकही धाव न करता बाद झाला होता. यानंतर आता १३ ऑक्टोबर रोजी पुन्हा दिल्लीच्या गोलंदाजांपुढे त्याने नांगी टाकली आहे. अशाप्रकारे कोणत्या आयपीएल हंगामात एका संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा शून्यावर विकेट गमावणारा मॉर्गन पहिलाच क्रिकेटपटू बनला आहे.
या २ लाजिरवाण्या विक्रमांबरोबरच त्याने एका हंगामात सर्वाधिकवेळा एकेरी धावा करण्याचा नको असलेला विक्रमही आपल्या नावावर केला आहे. दिल्लीविरुद्ध एकेरी धावेवर विकेट गमावण्याची ही त्याची तब्बल दहावी वेळ होती. या नकोशा विक्रमातही तो प्रथमस्थानी आहे. त्यामुळे अंतिम सामन्यापूर्वी मॉर्गनची ही फलंदाजी आकडेवारी संघासाठी मोठी चिंताजनक बाब बनली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून तर हरूनही सर्वांच्या मनावर दिल्लीचेच राज्य! हा एक फोटो पाहा सगळं समजेल
विश्वविजेता कर्णधार एमएस धोनीकडूनही झाल्या होत्या चूका, ‘या’ ५ निर्णायामुळे ठरला होता टीकेचा धनी






