आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 21 वा सामना बुधवारी (7 ऑक्टोबर) अबू धाबी येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होईल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळानुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल. गुणतालिकेत सध्या केकेआर चौथ्या स्थानावर आहे तर सीएसके पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना हा सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करायचे आहे. या हंगामात आतापर्यंत कोलकाताने 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. दुसरीकडे चेन्नईने 5 पैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत.
12 व्या हंगामात या दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले होते. या दोन्ही सामन्यात चेन्नईने सहज विजय मिळवला होता. तसेच या दोन संघात 20 सामने आत्तापर्यंत झाले आहेत. त्यात 13 वेळा चेन्नई संघाने बाजी मारली आहे, तर 7 वेळा कोलकाता संघाला सामना जिंकण्यात यश आले आहे.
कार्तिक आणि रसल फॉर्ममध्ये येणे आहे आवश्यक
कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक आणि अष्टपैलू आंद्रे रसल हे संघातील अत्यंत महत्त्वाचे खेळाडू आहेत. कार्तिकने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात केवळ 37 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रसलनेही 4 सामन्यांत 48 धावा केल्या असून असून 4 बळी घेतले आहेत. संघाचा सलामीवीर सुनील नरेनदेखील अद्याप काही खास कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे हे खेळाडू फॉर्ममध्ये येण्याची कोलकाताला आशा असेल.
मागील सामन्यात चेन्नईने केली उत्कृष्ट कामगिरी
या हंगामातील सलामीचा सामना जिंकल्यानंतर चेन्नईने सलग 3 सामने गमावले. त्यानंतर ५ व्या सामन्यात चेन्नईने पंजाबला 10 गडी राखून पराभूत केले. सलामीवीर फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसन यांनी जबरदस्त नाबाद अर्धशतकी खेळी खेळली. अशा परिस्थितीत विजयी मार्गावर परतलेला चेन्नई संघ आजचा सामना जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही.
दोन्ही संघातील महागडे खेळाडू
कोलकाताचा सर्वात महागडा खेळाडू म्हणजे पॅट कमिन्स. या हंगामासाठी त्याला 15.50 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यानंतर सुनील नरेनचा क्रमांक लागतो, त्याला 12.50 कोटी मिळतात. त्याचबरोबर, सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी हा चेन्नईचा सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला हंगामात 15 कोटी रुपये मिळतात. त्यांच्यापाठोपाठ केदार जाधव असून, त्याला एका हंगामात 7.80 कोटी रुपये मिळतात.
खेळपट्टी आणि हवामानाबद्दल माहिती
अबूधाबीतील सामन्यादरम्यान आकाश स्वच्छ राहील. तापमान 28 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान असेल. खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त राहील. खेळपट्टी संथ गतीची असल्याने फिरकीपटूंना खूप मदत होईल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देईल. शेवटच्या 45 टी20 सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 56.81 % आहे.
या मैदानावर झालेले एकूण टी 20 सामने : 44
प्रथम फलंदाजी करताना मिळालेल्या विजयाची संख्या : 19
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेल्या विजयाची संख्या : 25
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 137
दुसर्या डावात सरासरी धावसंख्या: 128
चेन्नईने 3 वेळा तर कोलकाताने 2 वेळा जिंकला किताब
कोलकाताने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दोनदा (2014, 2012) अंतिम सामना खेळला आहे आणि दोन्ही हंगामात कोलकाताने किताब जिंकला आहे. दुसरीकडे, धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने 2010 आणि 2011 मध्ये सलग दोनदा आयपीएलचा किताब जिंकला आहे. 2018 मध्येही या संघाने आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला होता.याव्यतिरिक्त चेन्नई संघ पाच वेळा (2008,2012, 2013, 2015 आणि 2019) आयपीएलचा उपविजेतेता राहिला आहे.
आयपीएलध्ये चेन्नईचा विजय मिळवण्याचा दर आहे सर्वाधिक
आयपीएलमध्ये चेन्नईचा विजय मिळवण्याचा दर 60.65% आहे. चेन्नईने आतापर्यंत एकूण 170 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 102 सामने जिंकले आहेत आणि 67 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्याचबरोबर कोलकाताने एकूण 182 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 94 जिंकले आहेत आणि 88 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. लीगमध्ये केकेआरचा विजय मिळवण्याचा दर 52.47% आहे.