कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध खेळला. शनिवारी (दि. 20 मे) ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या या सामन्यात लखनऊने कोलकाताला 1 धावांनी नजीकचा पराभवाचा धक्का दिला. या पराभवानंतर केकेआर संघाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. तसेच, लखनऊने प्ले-ऑफमध्ये एन्ट्री केली. असे असले, तरीही केकेआर संघाचा विस्फोटक फलंदाज रिंकू सिंग हा भलताच चमकला. त्याने 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वादळी फलंदाजी केली. लखनऊचा कर्णधार कृणाल पंड्या हा देखील त्याच्या या फलंदाजीचा चाहता झाला.
लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 विकेट्स गमावत 176 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाकडून रिंकू सिंग (Rinku Singh) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरताना 33 चेंडूत नाबाद 67 धावा कुटल्या. या धावा करताना त्याने 4 षटकार आणि 6 चौकारही मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 203.03 इतका होता. रिंकूने डावाच्या अखेरच्या चेंडूवरही षटकार मारला, पण केकेआर (KKR) संघ 1 धाव करण्यात अपयशी ठरला. या सामन्यानंतर कृणाल पंड्या (Krunal Pandya) याने रिंकूचे कौतुक केले.
‘आम्ही कधीच हार मानली नाही’
लखनऊचा कर्णधार म्हणाला की, “आम्ही कधीच हार मानली नाही. आमच्यावर खूप दबाव होता. मात्र, याचे श्रेय संघाच्या खेळाडूंना जाते. एकेवेळी ते 1 बाद 61वर होते. मात्र, या स्तरावर आम्हाला वाटले की, फक्त दोन किंवा तीन गोंधळात टाकणारे षटके खेळाची स्थिती बदलू शकतात. फिरकीपटूंसाठीही फायदा होता.”
रिंकूविषयी भाष्य
कृणालने रिंकूची प्रशंसा करताना म्हटले की, “रिंकूसाठी हे वर्ष खूपच खास ठरले. प्रत्येक सामन्यात जेव्हा तो असतो, तेव्हा तुम्ही त्याला हलक्यात घेऊ शकत नाहीत. आज त्याने पुन्हा हे दाखवून दिले. मात्र, अखेरच्या षटकात गोलंदाजी करताना आपल्या योजना व्यवस्थित पार पाडण्यासाठी ही एक उच्च दबावाची स्थिती ठरली. मी प्रत्येक चेंडूनंतर माझ्या गोलंदाजांशी बोलत होतो. मी त्यांना आपल्या योजना अंमलात आणण्यास सांगितल्या. तरीही जर फलंदाज शॉट खेळत असेल, तर आम्ही काहीच करू शकत नाही.”
‘यश ठाकूर आत्मविश्वासू होता’
यश ठाकूर याला 20वे षटक देण्याच्या निर्णयावर कृणाल म्हणाला की, “मी माझ्या भावनेसोबत जातो. मागील सामन्यात काही रिव्हर्स स्विंग होती, त्यामुळे मी मोहसिनसोबत गेलो. आज मी यशसोबत गेलो. कारण, खेळपट्टी मंद होती आणि काही चांगल्या षटकांनंतर तो आत्मविश्वासू होता.”
लखनऊ संघ या विजयासह 24 मे रोजी होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यात पोहोचला आहे. आता या सामन्यात त्यांचा सामना कोणत्या संघाशी होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (kkr vs lsg you cant take it easy skipper krunal pandya praised rinku singh batting gave reason for yash thakur 20th over)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वॉर्नरच्या संघासाठी निराशाजनक ठरली आयपीएल 2023, पण कर्णधाराने विराटला पछाडत नावावर केला मोठा विक्रम
लखनऊ सुपर जायंट्स क्वॉलिफायर दोनसाठी पात्र, केकेआरच्या विजयासाठी रिंकू पुन्हा झगडला