---Advertisement---

टेनिस बॉलशी सराव करत ‘हा’ वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये दाखल! रोहित-सूर्याला आऊट करत बनला केकेआरचा नवा स्टार

On: गुरूवार, मे 21, 2026 2:51 PM
---Advertisement---

आयपीएल हे युवा खेळाडूंना त्याची प्रतिभा सिद्ध करण्याचे एकप्रकारचे व्यासपीठच बनले आहे. यामध्ये अनेकांनी त्यांच्या कामगिरीने अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना चकित केले आहे. बुधवारी (२० मे) ईडन गार्डन्सवर पुन्हा तसेच घडले. कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजाने जो आपल्या आयपीएल कारकिर्दीतील तिसराच सामना खेळता होता आणि त्याने मुंबई इंडियन्सच्या दोन मोठ्या स्टार फलंदाजांना बाद केले.

केकेआरच्या त्या वेगवान गोलंदाजाने काही चेंडूतच सामन्याला वळण दिले. पहिले तर त्याने रोहित शर्माला आणि नंतर भारताच्या टी२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या विकेट्स घेत खळबळ माजवली.

आयपीएल २०२६ मध्ये बुधवारी ६५ वा सामना केकेआर विरुद्ध एमआय असा खेळला गेला. यामध्ये सौरभ दुबेने लक्षवेधी कामगिरी केली. त्याने एमआयच्या डावाच्या चौथ्या षटकातील पाचव्या चेंडूवर रोहितला कॅमेरॉन ग्रीनकरवी झेलबाद केले. रोहित १३ चेंडूंत १५ धावा करत बाद झाला. तसेच त्याने त्याच्या पुढच्याच षटकात सूर्यकुमारलाही तंबूचा रस्ता दाखवला. त्याने सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमारला त्रिफळाचीत केले. त्याने ६ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने १५ धावा केल्या. अशाप्रकारे एमआयच्या पॉवरप्लेमध्येच ४ विकेट्स पडल्या

त्याचबरोबर सौरभच्या टी २० मधील पहिल्या तीन विकेट्स जॉस बटलर, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या आहेत.

नेमका सौरभ दुबे कोण आहे?
देशांतर्गत स्पर्धांमध्ये विदर्भासाठी खेळणारा २८ वर्षीय सौरभ हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याला केकेआरने आयपीएलचा १९ वा हंगाम सुरू होण्याआधी दुखापतग्रस्त आकाशदीपच्या जागी करारबद्ध केले. त्याने आपल्या पहिल्या आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्सच्या बटलरला बाद करत पहिली आयपीएल विकेट पटकावली होती. आता त्याने रोहित-सूर्यकुमारच्या विकेट्स घेत त्याच्या टी२० कारकिर्दीतील सर्वात मोठ्या कामगिरीची नोंद केली.

सौरभचा क्रिकेटचा प्रवास संघर्षाने भरलेला असून तो लहानपणी केवळ टेनिस-बॉलने क्रिकेट खेळायचा. तसेच त्याला व्यावसायिक क्रिकेटमध्ये कसे यायचे हे पण माहित नव्हते. २०१६ मध्ये तो ब्रदरहूड क्रिकेट असोसिएशनमध्ये सामील झाला आणि पहिल्यांदा लेदर बॉलने क्रिकेट खेळला. त्याच्या आईची त्याने इंजिनियर बनावे अशी इच्छा होती, मात्र त्याने क्रिकेटचे स्वप्न बाळगले आणि ते पूर्णही करण्याच्या मार्गावर तो आहे. त्याने ८ लिस्ट ए चे सामने खेळले असून त्यात १६ विकेट्स घेतल्या आहेत.

या सामन्यात एमआयने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ८ विकेट्स गमावत १४७ धावा केल्या. केकेआरने हे लक्ष्य १८.५ षटकांत ६ विकेट्स गमावत गाठले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---