---Advertisement---

अफलातून खेळीसह राहुलने मिळवले दिग्गजांच्या पंक्तित स्थान

On: सोमवार, नोव्हेंबर 8, 2021 11:43 PM
---Advertisement---

यूएई येथे होत असलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाने एका शानदार विजयासह स्पर्धेला निरोप दिला. नामिबिया विरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने ९ गडी राखून मोठा विजय मिळवला. पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा मावळल्या होत्या. या सामन्यात सलामीवीर केएल राहुलने दमदार अर्धशतक ठोकत दिग्गजांच्या एका खास यादीत आपले नाव नोंद केले.

राहुलने झळकावले स्पर्धेतील दुसरे अर्धशतक
या अखेरच्या साखळी सामन्यात नामिबियाने ठेवलेले १३३ धावांचे लक्ष पार करताना केएल राहुलने ३६ चेंडूवर ४ चौकार व दोन षटकार ठोकत १५० च्या स्ट्राईक रेटने नाबाद ५४ धावा तडकावल्या. त्याचे हे स्पर्धेतील दुसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने अफगाणिस्तान विरूद्ध १८ चेंडूवर अर्धशतक साजरे केले होते. हे स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक ठरलेले.

दिग्गजांच्या यादीत झाला समाविष्ट
नामिबियाविरुद्ध केलेल्या ५४ धावांसह राहुलने पहिल्या ५० टी२० डावांमध्ये १७५१ धावा पूर्ण केल्या. या यादीमध्ये भारताचा विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या पहिल्या ५० टी२० डावांमध्ये १९४३ तर, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने १९४२ धावा काढल्या होत्या. राहुल या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच १६६३ धावांसह चौथ्या तर, न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅकुलम १५९८ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

स्पर्धेत केली शानदार कामगिरी
आपला पहिला टी२० विश्वचषक खेळत असलेला राहुल या स्पर्धेमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने पाच सामन्यांच्या पाच डावात १९४ धावा केल्या. रोहित शर्मासह त्याने अखेरच्या तीन सामन्यात भारतीय संघाला शानदार सलामी दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---