भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West India) संघात १६ फेब्रुवारीपासून ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. या मालिकेतून भारताच्या टी२० संघाचा उपकर्णधार केएल राहुल आणि फिरकीपटू अक्षर पटेल बाहेर झाले आहेत. दोघेही दुखापतग्रस्त झाल्याने या मालिकेला मुकणार आहेत. त्यांच्याऐवजी पुण्याचा ऋतुराज गायकवाड आणि बडोद्याच्या दीपक हुडा यांना संघात संधी देण्यात आली आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार केएल राहुलला ९ फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात डाव्या बाजूला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. तसेच अक्षर नुकताच कोविड-१९ मधून बाहेर आल्यानंतर त्याच्या दुखापतीतून सावरण्याच्या अखेरच्या टप्प्यात आहे. हे दोघेही आता बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दाखल होतील. तिथे ते दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करतील.
https://twitter.com/BCCI/status/1492117409138081792
राहुल आणि अक्षर दोघेही दुखापतग्रस्त झाल्याने त्यांच्याऐवजी ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडाचा संघात समावेश करण्यात आला आहे. हे दोघेही वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग होते. याच वनडे मालिकेतून दीपकने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
तसेच ऋतुराजला मात्र वनडे मालिकेतील एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. तो वनडे मालिकेपूर्वी कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळला होता. पण आता तो यातून सावरला असून त्याने सरावाला सुरुवात केली आहे.
वेस्ट इंडिज विरुद्धची टी२० मालिका कोलकातामधील इडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेतील सामने अनुक्रमे १६, १८ आणि २० फेब्रुवारी रोजी होतील.
असा आहे भारताचा टी२० संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा.






