आयपीएल २०२१ मधील ५३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात गुरुवारी (७ ऑक्टोबर) खेळला गेला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने ६ गडी राखून विजय मिळवला. यासह त्यांच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने नाबाद ९८ धावांची आक्रमक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या खेळीदरम्यान त्याने अशी एक कामगिरी केली जी यापूर्वी केवळ भारताच्या काही दिग्गजांनी केली होती.
राहुलची कॅप्टन्स इनिंग
प्ले ऑफसाठी पात्रता मिळविण्यासाठीची अल्पशी संधी असलेल्या पंजाबला या सामन्यात १३५ धावांचे आव्हान ११ षटकात गाठण्याची गरज होती. कर्णधार राहुलने या डावाचे सूकाणू हाती घेत तुफानी सुरुवात केली. त्याने केवळ ४२ चेंडूत ७ चौकार व ८ उत्तुंग षटकारांची मेजवानी सादर करून नाबाद ९८ धावांची खेळी केली. यासह त्याने सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीतील आपले पहिले स्थान आणखी मजबूत केले. तो आता १३ सामन्यात ६२६ धावा घेत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सर्वात पुढे गेला आहे.
दुसरी सर्वात्तम खेळी
नाबाद ९८ धावांच्या खेळीसह कर्णधार म्हणून धावांचा पाठलाग करताना नाबाद राहत आयपीएल मध्ये सर्वात मोठी खेळी करण्याच्या बाबतीत राहुल दुसऱ्या क्रमांकावर आला. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आरसीबीचा कर्णधार विराट कोहली असून, त्याने २०१६ हंगामात रायझिंग पुणे सुपरजायंटविरूद्ध नाबाद १०८ धावा ठोकलेल्या. दिल्लीचा माजी कर्णधार वीरेंद्र सेहवाग नाबाद ९४ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलच्या पहिल्या हंगामात डेक्कन चार्जर्सविरुद्ध ही खेळी केली होती.
पंजाबचा शानदार विजय
गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्स व सहाव्या क्रमांकावर पंजाब किंग्स यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने फाफ डू प्लेसिसच्या ७६ धावांच्या जोरावर ६ बाद १३४ धावा बनविल्या. पंजाबसाठी अर्शदीप सिंग व ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. प्रत्युत्तरात, कर्णधार राहुलने अविश्वसनीय खेळी करत सामना पंजाबच्या पारड्यात टाकला. या सामन्यात पराभूत झाला असला तरी चेन्नई गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. दुसरीकडे, या विजयासह पंजाबने प्ले ऑफसाठी आपली दावेदारी राखली आहे.