महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे शुक्रवारी (२६ मार्च) झालेला दुसरा वनडे सामना भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याच्यासाठी खूप विशेष राहिला. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या या सामन्यात त्याने अफलातून शतक झळकावले. यामुळे भारताने पहिल्या डावात इंग्लंडला ३३७ धावांचे भलेमोठे लक्ष्य दिले. या शतकासह राहुलच्या खात्यात नवा विक्रम जमा झाला आहे.
आघाडीचे ३ फलंदाज बाद झाल्यानंतर राहुल चौथ्या क्रमाकांवर फलंदाजीस आला होता. त्याने ११४ चेंडूंचा सामना करताना १०८ धावा चोपल्या. या खेळीसाठी त्याने २ षटकार आणि ७ चौकार मारले. हे राहुलचे वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक ठरले.
यापुर्वी सलामीला आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने धावांची शंभरी पार केली होती. अशाप्रकारे वनडेत तीन किंवा त्यापेक्षा जास्त क्रमांकावर फलंदाजी करताना शतक करण्याचा शानदार विक्रम त्याच्या नावे झाला आहे.
राहुलपुर्वी एमएस धोनी, राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा, सुरेश रैना या माजी भारतीय क्रिकेटपटूंनी हा किर्तीमान केला आहे. यात धोनीने एकट्याने सर्वाधिक ५ वेगवेगळ्या क्रमांकावर शतक केले आहे. तर द्रविड, अझरुद्दीन आणि जडेजा यांनी तब्बल चार वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक ठोकले आहे. तर रैनाने तीन वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक करण्याचा पराक्रम केला आहे.
विशेष म्हणजे, राहुल हा भारताकडून तीन वेगवेगळ्या स्थानांवर शतक करणारा एकमेव सक्रिय फलंदाज आहे. त्याच्याव्यतिरिक्त इतर विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन अशा कोणत्याही सक्रिय भारतीयाला हा कारनामा करता आला नाही.
तीन वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक करणारे भारतीय
एमएस धोनी- ३, ४, ५, ६, ७
राहुल द्रविड- सलामी, ३, ४, ५
मोहम्मद अझरुद्दीन- ३, ४, ५, ६
अजय जडेजा- सलामी, ४, ५, ६
सुरेश रैना- ४, ५, ६
केएल राहुल- सलामी, ४, ५
महत्त्वाच्या बातम्या-
अन् राहुलच्या फ्लॉप शोवर पूर्णविराम! शतक केल्यानंतर पकडले कान, पाहा सेलिब्रेशनचा व्हिडिओ
पंतने चेंडू मारला सीमापार, तरीही टीम इंडियाला मिळाली नाही एकही धाव! वाचा कोणत्या नियमाचा बसलाय फटका
वनडे पदार्पणासाठी त्याने अजून काय करायला हवं? सूर्यकुमारला संधी न दिल्याने चाहत्यांचा विराटला प्रश्न