ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड व भारत यांच्यादरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसावर पाहुण्या भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. भारताचा सलामीवीर केएल राहुलने नाबाद शतक झळकावत भारताच्या फलंदाजीचे नेतृत्व केले. आपल्या या शानदार खेळी दरम्यान राहुलने अनेक नव्या विक्रमांना गवसणी घातली.
लॉर्ड्सवर ठोकले यादगार शतक
नॉटिंघम कसोटीत पहिल्या डावात अर्धशतक साजरे केलेल्या राहुलने लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाच्या फलंदाजीची धुरा वाहिली. सुरुवातीला रोहित शर्मासोबत १२६ धावांची सलामी त्याने दिली. त्यानंतर तिसर्या गड्यासाठी कर्णधार विराट कोहलीसह ११७ धावा जोडल्या.
यादरम्यान राहुलने आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. राहुलने पहिल्या दिवसाखेर नाबाद राहताना १२ चौकार व एका षटकाराच्या मदतीने १२७ धावा केल्या.
सेहवागची केली बरोबरी
राहुलने या शतकासह सलामीवीर म्हणून आशिया बाहेरील आपले चौथे कसोटी शतक पूर्ण केले. त्याने या बाबतीत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली. विनू मंकड व रवी शास्त्री यांनी देखील आशिया खंडाबाहेर सलामीवीराची भूमिका पार पाडताना प्रत्येकी तीन शतके झळकावली आहेत. याबाबतीत आघाडीवर भारताचे सर्वकालीन महान सलामीवीर सुनील गावसकर हे आहेत. त्यांनी आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीत तब्बल १५ शतके आशिया खंडाबाहेर ठोकली होती.
राहुलच्या नावे असेही विक्रम
या शानदार शतकी खेळीदरम्यान राहुलने आणखी काही विक्रम आपल्या नावे केले. विनू मंकड व रवी शास्त्री यांच्यानंतर लॉर्ड्स मैदानावर शतक झळकावणारा तो केवळ तिसरा भारतीय सलामीवीर ठरला. तसेच, सलामीवीर म्हणून भारतातर्फे जी अखेरची चार शतके विदेशी भूमीवर ठोकली गेली आहेत, ती सर्व शतके राहुलच्या नावे आहेत. त्याने २०१५ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी कसोटीत, २०१६ वेस्ट इंडिज दौऱ्यावेळी किंग्सटन कसोटीत व २०१८ ओव्हल कसोटीत त्याने ही कामगिरी केलेली.
महत्त्वाच्या बातम्या-
अरे बापरे..! अंधारामुळे बाद झाला रोहित शर्मा? वाचा नेमकं काय घडलं ते….