---Advertisement---

इंग्लंडचा २०१८ चा दौरा अपयशी ठरला, पण यंदा ‘हे’ ध्येय मनाशी पक्कं करुन आलोय, केएल राहुलने व्यक्त केला विश्वास

On: बुधवार, ऑगस्ट 11, 2021 12:53 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात केएल राहुलने सलामीला येत नॉटिंघमच्या मैदानात ८४ धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे त्याच्या या फलंदाजीचे सर्वत्र कौतुक केले जात होते. असे असले तरी काही काळापूर्वी राहूलला कसोटीमध्ये भारतीय संघात स्थान मिळणेही मुश्कील झाले होते.

याला कारण असे की, अनेकवेळा कसोटीमध्ये भारतीय संघात सलामीला संधी मिळूनही राहुलला चांगली कामगिरी करता आली नाही. याचेच उदाहरण म्हणजे २०१८ मधील इंग्लंडचा दौरा, ज्यात राहुलची कामगिरी असमाधानकारक राहिली होती. त्यामुळे यानंतर राहुलला कसोटी संघातून वगळण्यात आले. यानंतर त्याला संघात स्थान मिळत न्हवते.

या दौऱ्यातही राहुलला मधल्या फळीत खेळण्यासाठी वाट पहावी लागली असती. परंतु, सरावादरम्यान मयंक अगरवालला डोक्याला दुखापत झाल्याने राहुलला मयंक अगरवाल ऐवजी संघात स्थान देण्यात आले. तसेच राहुलने देखील या संधीचा लाभ घेत उत्कृष्ट फलंदाजी करत संघातील आपल्या स्थानाची दावेदारी सिद्ध केली.

आपल्या फलंदाजीच्या जोरावर राहुलने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात २१४ चेंडूंचा सामना करत ८४ धावा केल्या. जे भारतीय संघातील खेळाडूंकडून खेळण्यात आलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. त्यामुळे भारतीय संघ पहिल्या दिवसापासून आघाडीवर होता. परंतु, पाचव्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे अखेरच्या दिवशी एकही चेंडू न खेळता सामना अनिर्णित राहिला.

नंतर याबाबत बोलताना राहुल म्हणाला, “मागील दौऱ्यात माझ्याकडून काही खास कामगिरी झाली नाही. परंतु, त्या दौऱ्यातून मला खूप काही शिकायला मिळाले. त्यामुळे यंदाच्या दौऱ्यात मी चांगली कामगिरी करण्याचे ध्येय मनाशी बाळगून आलेलो आहे.”

मागील इंग्लंड दौरा राहुलसाठी खूपच खराब होता. तेव्हा राहुल ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू मारण्याच्या नादात नेहमी आऊट व्हायचा. नको असलेले शॉट खेळून तो त्याची विकेट गमवायचा. परंतु यंदाच्या दौऱ्यात ज्याप्रकारे त्याने फलंदाजी केली. हे पाहता त्यानी याबाबत बरीच मेहनत केलेली दिसून येते.

पुढे राहुल म्हणाला, “मला संघात स्थान न मिळाल्याने मी खूप निराश व्हायचो. परंतु, या दरम्यान मला माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करून सुधारणा करायला संधी मिळत होती.” त्याचबरोबर राहुल म्हणाला, “मी नेहमी संघासोबत असायचो, परंतु मला नेहमीच बेंचवर बसावे लागायचे. संघाचा भाग असणे ही अभिमानाची गोष्ट आहे. परंतु संघात खेळण्याची संधी न मिळाल्याने मी खूपदा निराश व्हायचो. परंतु आता जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी फक्त संघात माझे योगदान देण्याचा प्रयत्न केला. ”

“मला नेहमीच संघातील माझी भूमिका बदलावी लागते, यावरून आता मला जास्त अडचण येत नाही. संघाला जेव्हा गरज असते तेव्हा मी सलामी फलंदाज म्हणून आणि मधल्या फळीतील फलंदाज म्हणून देखील माझे कर्तव्य बजावू शकतो. हेच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे माझा आत्मविश्‍वास वाढतो,” असेही तो म्हणाला.

महत्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडचा दिग्गज अष्टपैलू मुख्य धमनी फुटल्यामुळे रुग्णालयात दाखल; देतोय मृत्यूशी झुंज
हाँगकाँगकडून २०१४ टी२० विश्वचषकात खेळलेला ‘हा’ खेळाडू आता खेळणार न्यूझीलंडकडून
‘इंग्लंडसाठी किती सूटकेस भरून कपडे आणलेस’ दिनेश कार्तिकचा ‘हा’ फोटो पाहून ऑसी क्रिकेटरचा प्रश्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---