रविवारी (२४ ऑक्टोबर) आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही आशियाई संघ समोरासमोर होते. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, पाकिस्तान संघाने खेळाच्या तिन्ही प्रकारात दमदार कामगिरी करून भारतीय संघावर १० गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारताचे पाकिस्तानवर विश्वचषकात असलेले वर्चस्व समाप्त झाले. मात्र, आता या सामन्यातील एक वादग्रस्त घटना समोर आली आहे.
काय घडली घटना?
या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत होता. रोहित शर्मा पहिल्या षटकात बाद झाल्यानंतर भारतीय संघावर दडपण आले होते. भारतीय संघ रोहितच्या बाद होण्यातून सावरत असतानाच, तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शाहीन आफ्रिदीने सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलचा त्रिफळा उडवला. राहुलने ८ चेंडूंचा सामना करताना ३ धावा बनविल्या. मात्र, आता राहुलच्या बाद होण्यावर वाद निर्माण झाला आहे.
राहुल ज्या चेंडूवर बाद झाला तो चेंडू नो बॉल असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. गोलंदाजा आफ्रिदीचा पाय पूर्णपणे रेषेच्या पलीकडे गेल्याचे दिसतेय. आयसीसीच्या नियमानुसार आता तिसरे पंच प्रत्येक चेंडू नो बॉल आहे की नाही हे पाहत असतात. मात्र, त्यांच्याकडून ही अक्षम्य चूक झाल्यानंतर भारतीय चाहते संतापले आहेत. अनेक चाहत्यांनी पंचांवर खराब पंचगिरी केल्यामुळे टीका करण्यास सुरुवात केली आहे.
भारतीय संघाचा झाला लाजीरवाणा पराभव
दुबई येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाला एका नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर १५१ अशी सन्मानजनक धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात, कर्णधार बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने दहा गडी राखून विजय मिळवला. भारताच्या पहिल्या तीनही फलंदाजांना बाद करणाऱ्या शाहीन आफ्रिदीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषक: दोन दिवसांत लागले धक्कादायक निकाल; अशी आहे गुणतालिकेची स्थिती
आफ्रिदीचा ओव्हरथ्रो आणि भारताला मिळाल्या जास्तीच्या ४ धावा; पाहून जय शहा, अक्षय कुमारही लागले नाचू