‘क्रिकेटचा मक्का’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शतक ठोकणं ही प्रत्येक फलंदाजाची महत्वाकांक्षा असते. कारण, लॉर्ड्सवर शतक करणाऱ्या खेळाडूचं नाव ऑनर्स बोर्डवर लिहलं जातं. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटीत टीम इंडियाच्या सलामीवीर के.एल. राहुलने हे स्वप्न पूर्ण केलं. मात्र, त्याच्या या वैयक्तिक यशाच्या बदल्यात संघाला रिषभ पंतच्या विकेटची मोठी किंमत मोजावी लागली.
भारताने जेव्हा 107 धावांवर कर्णधार शुबमन गिलची विकेट गमावली, तेव्हा रिषभ पंत फलंदाजीला आला. त्याने राहुलसोबत दमदार भागीदारी करत भारताची परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांची जोडी मैदानावर चांगली जमली होती, मात्र लंचपूर्वी राहुल 90 धावांच्या आसपास पोहोचला आणि त्याला लंचपूर्वीच शतक पूर्ण करायचं होतं.
मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत के.एल. राहुलने स्वतः याचा खुलासा केला. तो म्हणाला, “लंचच्या काही वेळ आधीच आमच्यात बोलणं झालं. मी त्याला (पंतला) सांगितलं होतं की शक्य झालं, तर लंचपूर्वी शतक पूर्ण करेन. आणि बशीरचा शेवटचा ओव्हर होता, म्हणून मला वाटलं की हीच ती संधी. पण दुर्दैवाने माझा फटका थेट फील्डरकडे गेला.”
राहुल पुढे म्हणाला, “तो फटका असा होता की मी सहज चौकार मारू शकलो असतो. त्यानंतर पंत फक्त स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न करत होता, की मी परत स्ट्राइकवर येऊ शकतो का. पण हो, तसं व्हायला नको होतं. त्या रनआउटनं खरंच खेळाची गतीच बदलली. दोघांसाठीच ही खूप निराशाजनक गोष्ट होती. कुणालाही अशा प्रकारे आपलं विकेट गमवायचं नसतं.”






