इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२१) चौदावा हंगाम आता अंतिम टप्प्याकडे आला आहे. स्पर्धेतील आता बाद फेरीचे सामने सुरू झाले आहेत. हा हंगाम अखेरीकडे आला असला तरीही आत्तापासून स्पर्धेच्या पुढील हंगामाची चर्चा सुरू होऊ लागली आहे. कारण, पुढील हंगामासाठी दोन नवीन संघ सहभागी होणार असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केली असून, त्यानंतर खेळाडूंचा मेगा लिलाव पार पडेल. तत्पूर्वी, सध्या पंजाब किंग्सचे नेतृत्व करणारा भारताचा प्रमुख सलामीवीर केएल राहुल हा आपल्या संघाची साथ सोडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
पंजाबची साथ सोडणार राहुल?
एका प्रसिद्ध क्रिकेट संकेतस्थळाच्या माहितीनुसार, केएल राहुल पुढील हंगामात पंजाब संघाकडून खेळण्याची शक्यता कमी झाली आहे. राहुलला आत्ताच अनेक फ्रॅंचाईजींनी पुढील हंगामासाठी आपल्या संघाकडून खेळण्याचे प्रस्ताव दिले गेले आहे. अद्याप राहुल व पंजाब संघ व्यवस्थापन यांच्याकडून मात्र याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. माध्यमांतील वृत्तानुसार, विराट कोहलीने राजीनामा दिल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पुढील हंगामात राहुलला कर्णधार करण्यात सर्वाधिक उत्सुक असल्याचे समजते.
अप्रतिम फॉर्ममध्ये आहे राहुल
केएल राहुल २०१८ पासून पंजाब किंग्स संघाचा भाग आहे. तसेच, गेली दोन हंगाम त्याने पंजाबचे नेतृत्व केले. या दोन्ही हंगामात तो सर्वाधिक धावांसह ऑरेंज कॅपचा मानकरी ठरत असला तरी, संघाला दोन्ही वेळी प्ले ऑफमध्ये पोचवण्यात त्याला अपयश आले. राहुलने या चारही हंगामात ६०० पेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी केली आहे. राहुलने रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे उपकर्णधार पद देखील भूषवले होते.
सध्याच्या हंगामात ऑरेंज कॅपचा प्रबळ दावेदार
भारत आणि यूएई येथे झालेल्या आयपीएल २०२१ मध्ये राहुलने १३ सामने खेळताना १३८ च्या स्ट्राईक रेटने ६२६ धावा केल्या असून, सलग दुसऱ्या वर्षी तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरू शकतो. त्याला यासाठी चेन्नईचा ऋतुराज गायकवाड व फाफ डू प्लेसिस यांच्याशी स्पर्धा करावी लागेल.






