---Advertisement---

आयपीएलचा ‘मिलियन डॉलर बेबी’ ग्लेन मॅक्सवेल

On: शनिवार, जानेवारी 30, 2021 10:00 AM
---Advertisement---

आयपीएलचा पाचवा हंगाम म्हणजेच २०१२ आयपीएलच्या मध्यात, दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात सामील असलेल्या ट्रेविस बर्टला दुखापत झाली आणि तो स्पर्धेतून बाहेर पडला. दिल्ली व्यवस्थापनाने त्याच्या जागी एका तरुण ऑस्ट्रेलियन खेळाडूची निवड संघात केली. तो २४ वर्षीय फलंदाज होता ग्लेन मॅक्सवेल. हे नाव भारतीय क्रिकेटचाहत्यांनी प्रथमच ऐकले होते. या खेळाडूविषयी सांगताना, त्यावेळी दिल्लीचे गोलंदाजी प्रशिक्षक असलेले टीए शेखर म्हणाले,

“गेल्यावर्षी उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेत आम्ही मॅक्सवेलला पाहिले होते. २००८ आयपीएल वेळी ज्याप्रकारे डेविड वॉर्नरने आम्हाला प्रभावित केले, त्याचप्रकारचा खेळाडू मॅक्सवेल देखील आहे. फलंदाजी सोबतच तो क्षेत्ररक्षणात अव्वल वाटतो. लवकरच तो ऑस्ट्रेलियासाठी खेळेल.”

शेखर यांनी केलेले भाकीत लवकरच खरे ठरले. २०१२ च्या ऑगस्ट महिन्यात त्याने अफगाणिस्तान विरुद्ध आपला पहिला वनडे खेळला. ग्लेन मॅक्सवेल नावाचा हा खेळाडू पुढे टी२० क्रिकेटचा बादशहा बनेल, असे तेव्हा कोणालाही वाटले नव्हते.

… म्हणून, त्याला ‘बिग शो’ काय म्हणतात

ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतामधील क्यू या ठिकाणी जन्मलेल्या मॅक्सवेलने साउथ बेलग्रेव क्रिकेट क्लबसाठी खेळत क्रिकेट कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. त्याला खरंतर, वेगवान गोलंदाज व्हायचे होते. पण, रन-अप लयबद्ध येत नसल्याने त्याने, ऑफ स्पिन गोलंदाजी करायला सुरुवात केली. मॅक्सवेल अगदी लहान वयातच उत्तुंग षटकार ठोकत तसेच क्षेत्ररक्षण करताना त्याच्या फेकीदेखील अचूक असत. कायम आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेल्या व ऊर्जावान मॅक्सवेलला संघ सहकारी व प्रसारमाध्यमांनी ‘बिग शो’ असे नाव दिले.

मॅक्सवेल वरिष्ठ क्रिकेटच्या वर्तुळात २००९ साली दाखल झाला. विक्टोरिया संघाचा सदस्य असलेल्या, मॅक्सवेलला २०१० हॉंगकॉंग क्रिकेट सिक्सेस या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून संधी देण्यात आली. मॅक्सवेल या स्पर्धेत मालिकावीर ठरला आणि ऑस्ट्रेलियाने प्रथमच ही स्पर्धा जिंकली. २०११ ला विक्टोरियाकडून त्याने आपले प्रथमश्रेणी पदार्पण केले. त्या वर्षीच्या रायबी वनडे कप स्पर्धेत टास्मानियाविरुद्ध अवघ्या १९ चेंडूत ५१ धावा फटकावल्या. त्यावेळी, ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील हा एक विक्रम होता. भारत, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेली उदयोन्मुख खेळाडूंची स्पर्धा गाजवत त्याने मालिकावीराचा किताब मिळवला. देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे, राष्ट्रीय संघाची दारे त्याच्यासाठी खुली झाली.

यूएईमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया यांच्यात तिरंगी मालिका आयोजित करण्यात आली होती. याच मालिकेतील अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने पदार्पण केले. पहिलीच मालिका त्याच्यासाठी संमिश्र राहिली असली तरी, २०१२ टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची ऑस्ट्रेलिया संघात निवड झाली. हा विश्वचषक त्याच्यासाठी विसरण्यासारखा राहिला.

आयपीएलचा ‘मिलियन डॉलर बेबी’

त्याचवेळी, २०१३ आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव झाला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काहीही ठोस कामगिरी न केलेल्या, मॅक्सवेलला आपल्या संघात घेण्यासाठी आयपीएल फ्रेंचायजींमध्ये चढाओढ रंगली. दिल्ली डेअरडेव्हिल्स व राजस्थान रॉयल्सला पछाडत मुंबई इंडियन्सने तब्बल पाच कोटी रुपये मोजत, त्याला आपल्या संघात निवडले. त्यावर्षीच्या आयपीएलमधील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्यावर्षी त्याला अवघे दोन सामने खेळण्याची संधी मिळाली.

मॅक्सवेलसाठी २०१४ हे वर्ष अत्यंत लाभदायी ठरले. किंग्स इलेव्हन पंजाबने सहा कोटी रुपयांची मोठी बोली लावत, त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. हा हंगाम पूर्णपणे मॅक्सवेलचा राहिला. अत्यंत उच्च दर्जाच्या आक्रमक फलंदाजीचे प्रात्यक्षिक त्याने संपूर्ण स्पर्धेत दाखवले. १६ सामन्यात ५५२ धावा स्पर्धेच्या अखेरीस त्याच्या नावापुढे होत्या. आयपीएलपाठोपाठ टी२० विश्वचषक व भारताविरुद्धच्या, सात सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत तो ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा काढणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता. मॅक्सवेलला २०१४ आयपीएलसारखी कामगिरी पुन्हा कधीही करता आली नाही. दरवेळी त्याला करोडो रुपयांची बोली लावली गेली. मात्र, त्याने संघमालक क्रिकेट चाहत्यांना निराश केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आतापर्यंतची कामगिरी

ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये झालेल्या २०१५ विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा तो सदस्य होता. त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या साखळी सामन्यात ५१ चेंडूत शतक ठोकले होते. संपूर्ण स्पर्धेत, स्टीव स्मिथ व डेविड वॉर्नर यांच्यानंतर तो ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होता. २०१६ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी२० सामन्यात सलामीला येत, शतक करण्याचा पराक्रम केला.

मॅक्सवेलने २०१७ च्या भारत दौऱ्यावर कसोटी पदार्पण केले. आपल्या पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करत, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शतक करणारा मॅक्सवेल दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला. २०१७ च्या मध्य त्याचा फॉर्म इतका खराब झाला की, त्याला संघातून वगळण्यात आले. २०१८ च्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत त्याने पुनरागमन केले. पहिल्याच सामन्यात शतक साजरे करत, आपल्यात अजून बरेच क्रिकेट शिल्लक असल्याचे त्याने सांगितले. बॉल टेम्परिंग प्रकरणामुळे मॅक्सवेलची कसोटी संघातही वापसी झाली. २०१९ च्या भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाला विजयी करण्यात मॅक्सवेलचा सिंहाचा वाटा राहिला.

इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ विश्वचषकानंतर, त्याने अचानक क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचे ठरवले. त्याच्या या निर्णयाला भारताचा कर्णधार विराट कोहलीने पाठिंबा दर्शवला होता. याच काळात त्याने आपली भारतीय मैत्रीण विनी रमण हिच्याशी साखरपुडा उरकला. युएईमध्ये झालेल्या, आयपीएलमध्ये सामील होण्यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्ध खेळला गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील निर्णायक सामन्यात शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला विजयी केले होते. यासह त्याने त्याचे पुनरागमन धडाक्यात साजरे केले. पण तरीही आयपीएलमध्येच्या १३ व्या हंगामात मात्र त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. पण पुन्हा एकदा भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्याने पुन्हा त्याच्यातील दम दाखवत आक्रमक खेळी साकारल्या.

भारतीयांचा होणार जावई असलेला, जगभरातील गोलंदाजांचा कर्दनकाळ असलेला मॅक्सवेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तरी आपले ‘बिग शो’ हे नाव अजून तरी सार्थ करत आहे.

वाचा –

‘त्या’दिवशी चेन्नईमधील चेपॉक मैदानात सेहवागने वॉर्नची अक्षरशः पिसे काढली

यश-अपयशाचा सामना करत ऑस्ट्रेलियाचा नंबर एक सलामीवीर झालेला मॅथ्यू हेडन!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---