भारतात क्रिकेटमध्ये २०२१ वर्ष कोणी गाजवलं असा प्रश्न विचारला तरी त्यात कित्येकजण पुण्याच्या ऋतुराज गायकवाडचं नाव सहज घेतील. ऋतुराजने संपूर्ण वर्षात जवळपास प्रत्येक स्पर्धांमध्ये धावांचा पाऊस पाडला. आज (३१ जानेवारी) याच ऋतुराजचा २५ वा वाढदिवस आहे.
गेल्या २ वर्षात ऋतुराजने आपल्या कामगिरीची दखल सर्वांनाच घ्यायला लावली आहे. तो आता वेस्ट इंडिज विरुद्ध खेळतानाही दिसू शकतो. त्याला ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे. तर, आज ऋतुराजच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊ.
कोण आहे हा ऋतुराज?
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पारगावचा रहिवासी असलेला २५ वर्षीय ऋतुराज २०१६ पासून महाराष्ट्र संघाचा नियमित सदस्य आहे. त्याने २०१६ ला वयाच्या १९ व्या वर्षी महाराष्ट्राकडून रणजीमध्ये पदार्पण केले होते. सलामीवीर म्हणून उत्तमोत्तम कामगिरी करत ऋतुराजने भारतीय अ संघात देखील जागा मिळवली आहे.
भारताचा सार्वकालीन महान फलंदाज व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविड ऋतुराजचे तोंडभरून कौतुक करतो. ऋतुराज २०१९ देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया बी व दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया ब्ल्यू संघाचा सदस्य राहिला आहे. त्याने भारतीय अ संघाकडून पदार्पणाचा सामना इंग्लंड लायन्सविरुद्ध (इंग्लंड अ) खेळला. या सामन्यात त्याला खास काही करता आले नाही. तो शुन्यावर बाद झाला. मात्र त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.
त्यातही २०१९ हे वर्ष तर ऋतुराजसाठी खास ठरले. त्याने भारतीय अ संघाकडून खेळताना खोऱ्याने धावा केल्या. त्याने श्रीलंका अ आणि वेस्ट इंडिज अ संघाविरुद्ध खेळताना ८ डावात अनुक्रमे १८७*, १२५*, ८४, ७४, ३, ८५, २०, ९९ अशा धावा करताना एकूण ११२.८३ च्या सरासरीने ६७७ धावा केल्या.
एवढचे नाही तर या वर्षाच्या सुरुवातीला त्याने न्यूझीलंड दौऱ्यावर भारत अ संघाकडून खेळताना ३ वनडे सामन्यात ५१.३३ च्या सरासरीने १५४ धावा केल्या होत्या. त्याचा २०१८ मध्ये एमर्जिंग एशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघातही समावेश होता.
ऋतुराज देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आत्तापर्यंत २१ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात ३८.५४ च्या सरासरीने ४ शतके आणि ६ अर्धशतकांसह १३४९ धावा केल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने ५४.७३ च्या सरासरीने ६४ सामन्यात ३२८४ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने ६२ टी२० सामन्यात २०७० धावा केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/B0XU7XDlhC0/
आयपीएल कारकिर्द –
गेले ३ वर्षे ऋतुराज चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे. पण त्याला २०१९ च्या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र २०२० मध्ये त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्यानेही या संधीचा फायदा घेत त्याचे नाणे खणखणीत वाजवले आहे. तसेच २०२१ हंगामात तर त्याने शानदार कामगिरी करत सर्वाधिक धावा केल्या आणि ऑरेंज कॅप पटकावली.
असे असले तरी २०२० हंगामातील ऋतुराजच्या प्रवासाला काहीशी संघर्षपूर्ण सुरुवात झाली होती. आयपीएल सुरु होण्याआधीच त्याला कोरोना व्हायरची लागण झाली. त्याचा दुसरा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला अन्य खेळाडूंपेक्षा अधिक काळ क्वारंटाईन राहावे लागले. स्पर्धा सुरु झाल्यानंतर तो काही दिवसांनी संघात परतला. त्यानंतर त्याला अंबाती रायुडू ऐवजी संधीही दिली गेली. मात्र त्याला संधी मिळालेल्या पहिल्या ३ सामन्यात ०,५, ० अशा धावा तो करु शकला. असे असतानाही त्याला संघ व्यवस्थापनाने विश्वास दाखवत संघात ठेवले. नंतर ऋतुराजनेही हा विश्वास सार्थकी लावत सलग ३ सामन्यात ३ अर्धशतके ठोकली. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सलग ३ अर्धशतके करणारा चेन्नईचा पहिला खेळाडू ठरला. त्याने आयपीेलमध्ये ६ सामन्यात ५१ च्या सरासरीने २०४ धावा केल्या.
यानंतर २०२१ हंगामात ऋतुराजने सुरुवातीपासूनच धावांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. त्याने फाफ डू प्लेसिसबरोबर सलामी देत चेन्नईला चांगली सुरुवात मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने या हंगामात ४५.३५ च्या सरासरीने १ शतक आणि ४ अर्धशतकांसह ६३५ धावा केल्या. त्याला चेन्नईने २०२२ आयपीएल हंगामासाठीही संघात कायम केले आहे.
https://www.instagram.com/p/CVXtvzatFtQ/
मॅक्यूलमला पाहून भारावला होता ऋतुराज
ऋतुराजने वयाच्या ५ व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. २००३ मध्ये तो पुण्याच्या नेहरु स्टेडियममध्ये न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील सामना पाहायला गेला होता. त्यावेळी ब्रेंडन मॅक्यूलमला ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध स्कूप शॉट खेळताना पाहून ऋतुराज भारावला. त्यावेळी त्याचे मन क्रिकेटकडे आकर्षित झाले. त्यानंतर वयाच्या ११ व्या वर्षी तो पुण्यातील वेंगसरकर क्रिकेट अकादमीमध्ये दाखल झाला. पुढे जाऊन त्याने महाराष्ट्राच्या १४ आणि १६ वर्षांखालील संघाचेही प्रतिनिधित्व केले.
विशेष म्हणजे ज्या मॅक्यूलमला पाहून ऋतुराज प्रभावित झाला होता, त्याच मॅक्यूलमच्या समोर त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अर्धशतकी खेळी करत त्याच्या फलंदाजीचे कौशल्य आयपीएलदरम्यान दाखवले होते. मॅक्यूलम हा कोलकाता संघाचा सध्या आयपीएलमध्ये मुख्य प्रशिक्षक आहे.
कौटुंबिक पार्श्वभूमी –
ऋतुराजचा जन्म ३१ जानेवारी १९९७ ला महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. त्याचे वडील डीआरडीओमध्ये अधिकारी आहेत. तर त्याची आई शिक्षिका आहे. त्याच्या कुटुंबात कोणत्याही खेळाचा वारसा नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळणारा ऋतुराज पहिला सदस्य आहे.
२०१९ आयपीएलमध्ये धोनीला केले होते इंप्रेस –
२०१९ आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसली तरी त्याने चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला त्याच्या हुशारीने प्रभावित केले होते. २०१९ च्या आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्सचा अष्टपैलू आंद्रे रसल तुफानी फॉर्ममध्ये होता. त्याने चेन्नई विरुद्धही त्यांच्याच मैदानावर ५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५० धावांची खेळी केली होती. यावेळी त्याने त्याचे सर्व फटके लॉन्ग ऑफ आणि डीप स्क्वेअर लेगला मारले होते.
या सामन्यात कोलकताचा हा डाव संपल्यानंतर ऋतुराजने धोनीशी चर्चा केली होती. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार धोनीशी झालेल्या चर्चेबद्दल ऋतुराज म्हणाला, ‘मी धोनीला म्हणालो, माही भाई, आंद्रे रसल स्कुप आणि पॅडल करत नव्हता. त्यामुळे तू शॉर्ट फाइन लेगचा क्षेत्ररक्षक हलवून डीप स्क्वेअर लेगला लावू शकत होता.’
ऋतुराजच्या या निरिक्षणावर धोनी प्रभावित झाला. त्यावेळी धोनी ऋतुराजला म्हणाला होता, ‘तूझ्याकडे क्रिकेटची हुशारी आहे.’ त्यानंतर धोनीने शॉर्ट फाइन लेगला क्षेत्ररक्षण लावण्यामागील कारण सांगितले की तिथे जर रसलच्या बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागला तर झेल घेण्यासाठी तिथे क्षेत्ररक्षक ठेवला होता.
त्याचबरोबर ऋतुराज आणि धोनी २०१६ च्या रणजी ट्रॉफी दरम्यानही भेटले होते. त्यावेळी ऋतुराज झारखंड विरुद्ध महाराष्ट्राकडून पदार्पण करत होता आणि धोनी झारखंडचा मार्गदर्शक होता. त्यावेळीची आठवण सांगताना ऋतुराज म्हणाला, त्याला धोनीला प्रभावित करायचे होते. पण त्याला वरुण ऍरॉनचा बाउन्सर चेंडू लागला आणि त्याचे बोट फ्रॅक्चर झाले.
पण त्यावेळी चेंडू लागल्यानंतरही केदार जाधवने सांगितल्याने त्याने त्याचे खेळणे कायम केले होते. पण अखेर ऋतुराज बाद झाला. त्यानंतर धोनी लंचब्रेकमध्ये त्याला भेटण्यासाठी गेला आणि त्याने त्याच्या प्लॅस्टरवर ‘लवकर बरा हो’ असे लिहिले.
https://www.instagram.com/p/CHKVpEfp76b/
यानंतर २०१९ आयपीएल दरम्यान ऋतुराजने ही घटना अजूनही लक्षात आहे का असे देखील धोनीला विचारले होते. त्यावेळी धोनीने त्याला सांगितले की हो फक्त स्वाक्षरीच नाही तर ऋतुराजचा शॉटही लक्षात आहे. त्याचबरोबर धोनीने ऋतुराजला देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करत रहा असेही सांगितले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
बीबीएलमध्ये धमाका केलेल्या पंचरत्नांवर असेल आयपीएल फ्रॅंचाईजींची नजर
लिजेंड्स लीग खेळलेल्या ‘या’ दिग्गजाला खेळायचाय टी२० विश्वचषक; बोर्डाला म्हणाला, “मी एकदम फिट”
व्हिडिओ पाहा – ‘बाप बाप होता है…’ असं सेहवागने अख्तरला कधी म्हटलंच नव्हतं?