---Advertisement---

माहिमचा ‘शानदार शार्दुल’!

On: सोमवार, जानेवारी 25, 2021 7:36 AM
---Advertisement---

मुंबई.. जगातील अव्वल दहा शहरांमध्ये येईल असे सर्व सुखसोयींयुक्त महानगर.. याच मुंबईला लागून असलेला, पालघर जिल्हा म्हणजे निसर्गाने आपल्या रंगांची मुक्तपणे उधळण केलेले ठिकाण.. पालघर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणजे पालघर शहर.. याच, पालघरपासून अवघ्या १० मिनिटांच्या अंतरावर लागते ते माहीम गाव.. अनेक मराठी गाण्यांमध्ये पिकनिकसाठी ज्या गावाचा उल्लेख होतो ते गाव म्हणजे माहीम.. या गावच्या दुतर्फा नारळी-पोफळीची झाडे आणि गावच्या दुसऱ्या टोकाला विस्तीर्ण समुद्र.. अत्यंत शांत वातावरण असणाऱ्या या गावातील, सर्वसामान्य घरातील मुलगा आज भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतोय. मुंबईसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट गाजवल्यानंतर, भारतीय संघासाठी सातासमुद्रापार पालघरचे नाव नेणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणजे शार्दुल ठाकूर..

क्रिकेटपटूंचे घर

शार्दुलचे वडील नरेंद्र हे मुंबईतील पार्ले कॉलेजमधील क्रिकेट संघाचे प्रमुख खेळाडू होते. त्याचे एक काका मुंबई महानगरपालिकेच्या संघासाठी, तर दुसरे मुंबईतील स्थानिक संघासाठी क्रिकेट खेळत. त्यामुळे आपसूकच शार्दुलमध्ये क्रिकेटविषयी आवड निर्माण झाली. माहिमच्या जिल्हा परिषद शाळेतील मैदानावर लहानगा शार्दुल क्रिकेटचे धडे गिरवत होता.

‘इच्छा असे तिथे मार्ग दिसे’ या उक्तीप्रमाणे शार्दुलच्या आयुष्यातही एक सुखद घटना घडली. माहीम जवळील एका मैदानात टाटा स्टील कोचींग सेंटरने गुणवंत लहान मुलांसाठी क्रिकेट शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी दहा वर्षाचा असणारा शार्दुल, त्या शिबिरात सहभागी झाला. आपल्या फलंदाजीने, त्याने तेथील निवडकर्त्यांना प्रभावित केले. शार्दुलची निवड आता बोईसरच्या टाटा स्टील अथोरिटीच्या तेरा वर्षाखालील संघात झाली होती. येथूनच खऱ्या अर्थाने शार्दुलच्या क्रिकेट कारकीर्दीचा श्रीगणेशा झाला.

रोहित शर्माच्या ‘कोच’ने ओळखली प्रतिभा

पालघरमधील आनंदाश्रम इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असलेल्या शार्दुलने, क्रिकेटसाठी बोईसर येथील तारापूर विद्यामंदिर येथे प्रवेश घेतला. तारापूर विद्यामंदिरसाठी त्याने अनेक सामने जिंकून दिले. एका स्थानिक स्पर्धेत खेळत असताना, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे प्रशिक्षक असलेल्या दिनेश लाड यांनी शार्दुलचा खेळ पाहिला आणि ते खूप प्रभावित झाले. दिनेश लाड हे तेच प्रशिक्षक आहेत, ज्यांनी रोहित शर्मासारखा दर्जेदार खेळाडू भारतीय क्रिकेटमधील आहे. लाड यांनी शार्दुलच्या वडिलांना सांगितले की, शार्दुलमध्ये भरपूर गुणवत्ता आहे. त्याने मेहनत केली तर तो भारतीय संघासाठी खेळू शकतो. त्यावेळी, दहावीला असताना शार्दुल स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकू लागला. हाच शार्दुलच्या आयुष्यातला ‘टर्निंग पॉइंट’ ठरला.

दिनेश लाड यांनी वर्षभर शार्दुलला आपल्या घरी ठेवले. लाड सर त्याच्यावर विशेष मेहनत घेत. २००७ मध्ये एका स्थानिक स्पर्धेत खेळताना, शार्दुलने एकाच षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला होता.

त्यानंतर, शार्दुल अनेक वर्ष नियमितपणे ३.३० ला उठून, पालघर ते मुंबई असा रेल्वेने प्रवास करत. यावेळी त्याचे शिक्षणाकडे देखील दुर्लक्ष झाले नाही. त्याने एकदाही नापास न होता वाणिज्य शाखेची पदवी मिळवली आहे. याच बरोबर, मुंबईच्या तेरा वर्षाखालील संघापासून ते वरिष्ठ संघासाठी तो सातत्याने खेळत राहीला.

सचिनचा ‘तो’ सल्ला ऐकला आणि….

मुंबईच्या एकोणीस वर्षाखालील संघातून चांगली कामगिरी केल्याचे बक्षीस त्याला २०१२ मध्ये मिळाले. त्याने राजस्थान विरुद्ध आपला पहिला प्रथमश्रेणी सामना खेळला. आपल्या पहिल्या रणजी हंगामात तो फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यावेळी, त्याचे वजन ८५ च्या आसपास असल्याने, त्याच्या वजनाची जास्त चर्चा झाली होती. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील शार्दुलला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. शार्दुलने अगदी काही महिन्यांच्या काळात तब्बल १७ किलो वजन कमी केले होते.

वजन कमी केल्यानंतर, शार्दुलच्या गोलंदाजीला वेगळीच धार आली. २०१३-१४ च्या रणजी हंगामात सहा सामन्यात २७ तर, २०१४-१५ रणजी हंगामात १० सामने खेळत त्याने ४८ बळींची नोंद केली. शार्दुलने २०१५-१६ रणजीच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रविरुद्ध ८ बळी मिळवत, मुंबईला ४१ वे रणजी विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

किंग्ज इलेव्हन पंजाबने २०१५ आयपीएलसाठी त्याला आपल्या संघात निवडले होते. याचवेळी, २०१६ च्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. मात्र, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. २०१७ व २०१८ अशी सलग दोन वर्ष तो रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचा सदस्य होता.

आंतरराष्ट्रीय पदार्पणातच झाला ‘ट्रोल’

शार्दुलने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात, ऑगस्ट २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलंबो वनडेत केली. आपल्या पहिल्याच वनडेत त्याला भारतीय क्रिकेटचाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शार्दुलने आपल्या पहिल्या सामन्यात ‘१०’ क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरला होता. भारताचा सर्वकालीन महान खेळाडू सचिन तेंडुलकर या क्रमांकाची जर्सी घालत असल्याने, भारतीय क्रिकेटचाहत्यांचे या क्रमांकाची भावनिक नाते जोडले गेले होते. त्यानंतर पुढच्या सामन्यापासून, शार्दुल ‘५४’ क्रमांकाची जर्सी घालून मैदानात येऊ लागला.

शार्दुलने आत्तापर्यंतच्या आपल्या छोट्याशा कारकीर्दीत भारतासाठी १० वनडे व १५ टी२० सामने खेळत अनुक्रमे ११ व १९ बळी मिळवले आहेत. गेली तीन वर्ष तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून खेळताना दिसतोय. मात्र सध्या तो देशभरात चर्चेत आलाय ते त्याच्या ऑस्ट्रेलियन भूमीवरील कामगिरीने. २०१६ साली कसोटी पदार्पणात अवघ्या काही षटकांत दुखापतग्रस्त झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर पुढची चार वर्षे तो पुन्हा एकदा कसोटीत संधी मिळण्याची वाट बघत होता.

अखेर २०२१ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताचे प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने त्याला संधी मिळाली. या संधीचे शार्दुलने अक्षरशः सोने केले. शार्दुलने या सामन्यात गोलंदाजी करताना पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ४ बळी घेतले. याहूनही महत्वाचे म्हणजे भारताची फलंदाजी पहिल्या डावात ६ बाद १८६ अशा नाजूक अवस्थेत सापडली असतांना त्याने झुंजार ६७ धावांची खेळी केली. भारताच्या पहिल्या डावातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती.

शार्दुलच्या अष्टपैलू खेळामुळेच भारताला ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करत सलग दुसरा कसोटी मालिका विजय मिळवता आला. भारतात आल्यावर त्याचे या कामगिरीसाठी जंगी स्वागतही झाले. इथून पुढेही भारतासाठी असेच दमदार योगदान देत राहण्याचा शार्दुलचा मानस आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---