साल २००८ ला जेव्हा सुरूवात झाली, तेव्हा कोणाच्या ध्यानीमनी नसताना राजस्थान रॉयल्सने ट्रॉफी उंचावली. वॉर्नने चार-दोन इंटरनॅशनल स्टार्स आणि डोमेस्टिक क्रिकेटमधल्या पोरांच्या जीवावर ही ट्रॉफी नावावर केलेली. त्याच डोमेस्टिक पोरांपैकी एक होता स्वप्नील अस्नोडकर. आता हे नाव तुम्हाला ओळखीचे वाटले असेल. पण बऱ्याच दिवसांपासून न ऐकलेले. आयपीएल इतिहासातील वन सिझन वंडरची यादी बनवल्यावर ज्याचे नाव सर्वात टॉपला येईल तो स्वप्नील अस्नोडकर.
ज्यावेळी आयपीएलची घोषणा झाली तेव्हा देशातल्या साऱ्याच युवा क्रिकेटरना आयपीएलमध्ये खेळायची इच्छा झाली. लास्ट डोमेस्टिक सिझन गाजवलेल्या स्वप्निललाही हा मोह झाला. स्वप्निल गोव्याचा असला तरी, बेंगलोरसोबत त्याचे खास नाते होते. त्यामुळे बेंगलोर फ्रॅंचाईजी आपल्याला संधी देईल असे त्याला वाटले. शेवटी त्याचा भ्रमनिरास झाला. आरसीबीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. अचानक एके दिवशी सायंकाळी स्वप्निलला राजस्थान रॉयल्स टीम मॅनेजमेंटकडून फोन आला. त्यांनी त्याला आयपीएल खेळण्याविषयी विचारले. त्याने क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. टीम फायनल झाल्यावर जयपूर येथे पाचदिवसीय कॅम्प आयोजित केला गेलेला. स्वतः कोच आणि कॅप्टन शेन वॉर्न सर्व खेळाडूंवर नजर ठेवून होता. भारतातील खेळाडूंविषयी जास्त माहिती नसल्याने पहिल्या प्रॅक्टिस मॅचला त्याने स्वप्निलला तिसऱ्या नंबरवर बॅटिंगला पाठवले. ती मॅच स्वप्निलने गाजवली. पुढच्या प्रॅक्टिस मॅचेसमध्ये तो ओपनर बनला. तिसऱ्या नंबर प्रमाणेच ओपनिंगलाही त्याला फुल मार्क मिळाले.
आयपीएल सुरू झाल्यावर पहिल्या काही मॅचमध्ये त्याला बेंचवरच बसावे लागले. मात्र, केकेआरविरुद्ध संधी मिळताच त्याने ती संधी दोन्ही हाताने पकडली. ३४ चेंडूंवर ६० धावा चोपत तो रातोरात स्टार बनला. तेंडुलकरसारखा छोट्या उंचीच्या, उत्कृष्ट फुटवर्क आणि जबरदस्त हॅन्ड आय कॉर्डीनेशन असणाऱ्या स्वप्निलने आपल्या लॉफ्टेड ड्राईव्हने, पुल, हुक आणि उत्तुंग षटकारांनी पहिला सीझन गाजवला. त्याचा धडाका एवढा जबरदस्त होता की, त्याचा ओपनिंग पार्टनर असलेला द ग्रेट ग्रॅमी स्मिथ अक्षरशः झाकोळला गेला. सीझनच्या ९ मॅच खेळताना त्याच्या नावावर धावा होते ३११ आणि स्ट्राईक रेट होता १३३. राजस्थानच्या विजयात तो अनसंग हीरो ठरला. याचवेळी त्याला ‘छोटा पॅकेट बडा धमाका’ म्हटले जाऊ लागले.
स्वप्निल सांगतो, “पहिल्या सीझननंतर जेव्हा मी गोव्याला गेलो, तेव्हा सारेजण शॉक होते. ते विचारत होते हे कसे झाले? तू एवढ्या वर्ल्ड क्लास बॉलर्सला सिक्स कसे काय मारले? कारण, त्यांनी मला अशी बॅटिंग करताना कधी पाहिलेच नव्हते.”
पहिली आयपीएल गाजवल्यानंतर स्वप्निल टीम इंडियात खेळणार असे सर्वजण म्हणू लागले. मात्र, कदाचित त्याच्या नशिबात इतकेच यश लिहिले होते. आयपीएलच्या दुसऱ्या सिझनआधी त्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो एकही मॅच खेळू शकला नाही. पुढील दोन सिझनमध्ये मिळून त्याला केवळ तीन मॅच खेळायला मिळाल्या. त्यानंतर अनेकदा आयपीएल लिलावात नाव देऊनही त्याला कोणीही खरेदी केले नाही. २०११ नंतर तो पुन्हा कधीही आयपीएलमध्ये खेळताना दिसला नाही. शेन वॉर्नने म्हटलेली ‘गोव्याची तोफ’ लवकरच थंड झाली.
आयपीएल करियर जवळपास संपल्यात जमा झाल्यानंतर त्याने पूर्ण फोकस डोमेस्टिक क्रिकेटवर केला. गोव्याच्या बॅटिंगचा कणा बनला. गोव्याची कॅप्टन्सीही केली. वय वाढत होते, पण त्याने क्रिकेट खेळणे बंद केले नाही. अखेर त्याच्यासोबत तेच घडले जे कोणत्याही क्रिकेटपटूला आपल्यासोबत घडू नये असे वाटते. स्वप्नील अस्नोडकर आणि गोव्याचा दुसरा सीनियर शादाब जकाती यांच्यावर ज्युनियर खेळाडूंची जागा अडवल्याच्या आरोप झाला. अखेर त्याला २०१९ ला रिटायरमेंटचा निर्णय घ्यावा लागला. रिटायरमेंट घेताच अवघ्या काही दिवसात तो पुन्हा ग्राउंडवर आला. गोव्याच्या अंडर २३ टीमचा कोच बनून गोवा क्रिकेटची पुढची पिढी घडवण्यासाठी.
स्वप्निल सोबतच करीयर सुरु करणारे रवींद्र जडेजा, शिखर धवन, विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत आहेत. मात्र, त्यांच्या इतकीच प्रतिभा असणारा स्वप्निल सातत्य आणि नशीब या दोन्ही गोष्टीत कमी पडल्याने गुमनामीच्या अंधारात ढकलला गेला तो कायमचाच.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाचा –
महिला क्रिकेटविश्वात निर्विवाद सत्ता गाजवतायेत ऑस्ट्रेलियाच्या रणरागिणी
अशा तीन घटना, जेव्हा नो-बॉल ठरला भारतीय संघासाठी व्हिलन