क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यामध्ये खेळाडू केवळ आपली प्रतिभा व खेळाच्या जोरावर पुढे आगेकूच करत असतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखणी कामगिरी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळून त्या संधीचे सोने न करता आल्यास खेळाडू अंधारात जाण्याची अजिबात वेळ लागत नाही. क्रिकेटजगतात असे असंख्य खेळाडू पाहायला मिळतात. याच पठडीतला एक भारतीय खेळाडू ज्याने दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान व सर्वकालीन महान अष्टपैलू युवराज सिंग यांच्यासोबत आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. मात्र तो आपली कारकीर्द दिर्घ काळ लांबवू शकला नाही. हा खेळाडू म्हणजे भारताचा माजी यष्टीरक्षक विजय दहिया.
दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या विजय दहियाला केनिया विरुद्ध ३ ऑक्टोबर २००० रोजी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली. या सामन्यात झहीर खान व युवराज सिंगनेही वनडे कारकीर्दीला सुरुवात केली. नयन मोंगियाला मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर हटवले होते. त्यामुळे भारतीय संघाला एका चांगल्या यष्टीरक्षकाची गरज होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष दहियाकडे होते. प्रत्येकाला आशा होती की विजय दहिया ही पोकळी भरून काढेल. याच कारणाने संघ व्यवस्थापनाने विजय दहियाला संधी दिली. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी विजयला अनेक संधी दिल्या गेल्या. त्याला कसोटी सामन्यातही आजमावून पाहिले. मात्र, तो प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. एकीकडे झहीर-युवराजने कारकीर्द वाढवण्यासाठी जोरदार खेळ दाखविला, तर विजय दहियाची कारकीर्द १ वर्षात संपुष्टात आली.
अशी राहिली कारकीर्द
विजय दहियाने भारताकडून २ कसोटी, १९ वनडे सामने खेळले. नोव्हेंबर २००० मध्ये दहियाला झिम्बाब्वेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळण्याची संधी दिली गेली. यादरम्यान, त्याला एकदा फलंदाजीचीही संधी मिळाली. परंतु त्याला केवळ २धावा करता आल्या. त्याचबरोबर त्याने १५ वनडे डावांमध्ये २१६ धावा केल्या. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ५१ होती.
दहियाने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ३ ऑक्टोबर २००० रोजी खेळला होता, तर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ६ एप्रिल २००१ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. अशाप्रकारे, दहियाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द फक्त ६ महिने टिकली. दुसरीकडे, त्याने ८४ प्रथमश्रेणी सामन्यात ३५३२ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये खेळलेल्या ८३ सामन्यांत १३८९ धावा केल्या.
धोनीने मिळवली जागा
विजय दहिया भारतीय संघातील आपली जागा पक्की न करू शकल्याने भारताचा दर्जेदार यष्टीरक्षकासाठीचा शोध सुरू राहिला. अजय रात्रा, दिनेश कार्तिक व राहुल द्रविड यांनी काही काळ ही जबाबदारी पार पाडली. मात्र, २००४ च्या अखेरीस एमएस धोनीचे भारतीय संघात आगमन झाले. धोनीने आपल्या आक्रमक फटकेबाजीने व चलाख यष्टीरक्षणाने पुढील १५ वर्ष ती जागा आपली केली.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघात निवड झालेल्या नागवासवालाला बुमराहने दिला होता ‘हा’ मोलाचा सल्ला
एक वेळ अशी होती विनाकारणच रडायला यायचे, सानिया मिर्झाचा मोठा खुलासा
जाळ अन् धूर संगटच! टॅलेंटची खाण आहे ‘या’ क्रिकेटपटूची बायको; पटकावलाय मिस वर्ल्ड ऑस्ट्रेलियाचा किताब