आयपीएलचा पंधरावा सिझन धामधूमीत सुरू असताना आयुष बदोनी, शहाबाज अहमद, अभिनव मनोहर हे नवखे इंडियन प्लेयर धडाकेबाज खेळ करून सर्वांची मने जिंकत आहेत. या खेळाडूंचा खेळ पाहिला की, आयपीएलच्या याच व्यासपीठावरून पुढे आलेल्या अनेक जुन्या, पण त्यावेळी नव्या असलेल्या क्रिकेटर्सची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये असाच एक खेळाडूने लक्ष वेधले होते. हा खेळाडू होता महाराष्ट्रातील. मुंबई इंडियन्सकडून खेळलेला योगेश ताकवले.
आज आयपीएलच्या वाटेवरून टीम इंडियात गेलेल्या ऋतुराज गायकवाडसारखाच योगेश ताकवले पुणे जिल्ह्यातील पुरंदरच्या मातीतून उजवलेले रत्न. वडील रिक्षाचालक म्हणून पुण्यात काम करायचे. योगेश ११-१२ वर्षाचा होता तेव्हा पुण्यात उन्हाळ्यात क्रिकेट कॅम्प लागलेला. आता दोन महिने मुलं करणार काय म्हणून वडिलांनी त्यांच्या दोन्ही मुलांना कॅम्पमध्ये पाठवून दिले. इथेच त्याला क्रिकेटबद्दल प्रेम वाटू लागले. घरची परिस्थिती बेताची होती तरीही क्रिकेटप्रेमी असलेल्या वडिलांनी त्याला पाठिंबा दिला. योगेश क्लब क्रिकेट खेळू लागला. पुढे वयोगट क्रिकेटसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ट्रायल्स घेत होते. अंडर १४ संघात त्याची निवड झाली.
त्यावेळी नेहरू स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट संघ प्रॅक्टिस करायचा. शंतनु सुगवेकर, संतोष जेधे, ऋषिकेश कानेटकर, अभिजित काळे अशी नावे त्यावेळी महाराष्ट्राच्या संघात होती. हे सर्वजण बॅटिंग करत असताना वयोगट क्रिकेटमधील विकेटकीपरला विकेटकिपिंग करायला लावायचे. योगेशने दोन-तीन वर्ष फक्त हेच काम केले. पुढे त्याची महाराष्ट्र रणजी संघात निवड झाली. त्यावेळी चंद्रकांत पंडित महाराष्ट्राच्या संघाचे कोच बनलेले. ते योगेशला खूप हायली रेट करत. योगेशला सातत्याने संधी मिळावी असे त्यांना वाटायचे. त्यांनी त्याला मुंबईत येऊन खेळण्याचा देखील सल्ला दिला. योगेशने २००५ ला महाराष्ट्रासाठी रणजी पदार्पण केले.
असं म्हटेलं जातं योगेश कदाचित पहिला असा क्रिकेटर असेल ज्याला इंटरनॅशनल क्रिकेट न खेळता अँड्र्यू सायमंड्स आणि रिकी पॉंटिंगने स्लेज केलेले. २००६ चॅम्पियन्स ट्रॉफीआधी वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध महाराष्ट्र अशी प्रॅक्टिस मॅच ठेवण्यात आलेली. त्यात योगेशला पॉंटिंगने आणि सायमंड्सने डिवचलेले. पण योगेशने शानदार फिफ्टी मारत त्यांना उत्तर दिले.
२००७ ला मुंबईत प्रथमच एक टी२० टूर्नामेंट खेळली गेलेली. योगेश डी वाय पाटील अकॅडमीकडून खेळत होता. टूर्नामेंटच्या चार मॅचमध्ये त्याने दोन शतके ठोकली. पुढे आणखी एका लोकल टूर्नामेंटच्या फायनलमध्ये त्याने सेंचुरी मारली. द ग्रेट दिलीप वेंगसरकर यांना त्याचा खेळ भयंकर आवडलेला. योगेशला इंडिया ए संघात चान्स देण्यात आला. आता योगेशपासून टीम इंडिया फक्त एक पाऊल दूर असे सर्वांना वाटले.
इतक्यात आयपीएल सुरू होणार होती. डी वाय पाटील अकॅडमीचे कोच ऍबे कुरूविला यांनी आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सने योगेशचे नाव फायनल केल्याचे योगेशला सांगितले नव्हते. ते फक्त म्हणायचे तू सराव करत रहा. शेवटी आयपीएलला काही दिवस शिल्लक असताना त्यांनी योगेशला याबाबतची माहिती दिली. योगेश आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झाला.
पहिल्या आयपीएलच्या सुरुवातीच्या मॅचेससाठी सचिन फिट नव्हता. मुंबईने काही ओपनर चेक करून पाहिले, पण कोणी तितक प्रभावित केलं नाही. एकदा सर्व नेट सेशन संपला असताना सचिनने योगेशला पॅड बांधायला सांगितले. २०-२५ मिनिटे सर्वांनी त्याला बॉलिंग केली. योगेशने नॅचरल गेम दाखवत चांगली हीटिंग केली. जाता जाता सचिन त्याला फक्त एवढेच म्हणाला. तू उद्या खेळतोय. योगेशसाठी हे स्वप्न पूर्ण होणारे शब्द होते.
दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध दुसरा लिजंड सनथ जयसूर्यासोबत योगेश ओपनिंगला उतरला. जयसूर्याने त्याला स्ट्राइक घ्यायला लावली. समोर होता ग्रेटेस्ट ग्लेन मॅकग्रा. ४५ हजार चाहत्यांसमोर योगेश प्रथमच खेळत होता. हे सारे त्याच्यासाठी अविश्वसनीय होते. सचिनआधी योगेशने सचिनच्याच जागी आयपीएल पदार्पण केले ही गोष्ट अनेकांना माहीतही नसेल.
त्या सिझनला योगेश संघात फिक्स झाला. विकेटकिपर बॅट्समन म्हणून त्याची जागा बनली. सचिन संघात आला तरी, त्याच्या विकेटकिपिंग स्किलमुळे प्लेइंग इलेव्हनचा भाग राहिला. इतकंच काय, तर ज्यावेळी सचिन स्लिपमध्ये उभा असायचा तेव्हा चक्क योगेशकडून सल्ला घ्यायचा. सचिन म्हणायचा तू विकेटकिपर आहे, तू पीच समजू शकतोस. तू सांग कोणी बॉलिंग करायला पाहिजे. विकेटकीपर योगेशच्या बॅटिंगची झलक खऱ्या अर्थाने दिसली ती राजस्थान रॉयल्सविरुद्ध. पहिल्या सिझनला तुफान फॉर्ममध्ये असलेल्या शेन वॉटसनला त्याने एकाच ओव्हरमध्ये ४ फोर आणि १ सिक्स लगावलेला. तो तीन वर्ष मुंबई इंडियन्सचा भाग राहिला. पुढील दोन सीझनमध्ये त्याला जास्त संधी मिळाली नाही.
तीन वर्षतर तो आयपीएल खेळलाच नाही. २०१४ ला त्याला पुन्हा एकदा आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. यावेळी संघ होता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर. तिथे त्याने युनिव्हर्स बॉस क्रिस गेलसोबत ओपनिंग केली. त्या सीझनमध्ये पाच मॅच त्याने खेळल्या. सीएसकेविरूद्ध धोनीची स्टम्पिंग त्याने चुकवली आणि आरसीबी मॅच हरली. बस त्यानंतर योगेशला आयपीएलमध्ये कधीही संधी मिळाली नाही.
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये योगेश महाराष्ट्र सोडून त्रिपुराचा कॅप्टन बनलेला. कितीही टॉप कामगिरी केली तरी, त्याला आता टीम इंडियात संधी मिळणे अशक्य बनले होते. टीम इंडियापासून केवळ एक पाऊल दूर असलेला योगेश आता गुमनामीच्या वाटेवर चाललेला. आज योगेश खेळाडू म्हणून जरी क्रिकेटपासून बाजूला झाला असला तरी. क्रिकेटची नवी पिढी तयार करण्यासाठी झटताना दिसत आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
शेन वॉर्न त्याला ‘गोव्याची तोफ’ म्हणायचा, वाचा त्या स्वप्निल अस्नोडकरची संघर्षगाथा
‘हिटमॅन’ रोहितची आणि दिनेश कार्तिकच्या करीयरची गाडी रुळावर आणणारा ‘अभिषेक नायर’