ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्या दरम्यान उद्यापासून प्रतिष्ठित बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघातील खेळाडू पूर्णपणे तयार आहेत. सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहली व ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव स्मिथ यांच्यात झालेल्या चर्चेचा एक व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला. या व्हिडिओमध्ये विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली आपली सर्वोत्तम खेळी सांगितली आहे.
विराटने दिली स्मिथच्या प्रश्नांना उत्तरे
अत्यंत ‘हाय-व्होल्टेज’ समजल्या जाणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत सर्वांची नजर स्टीव स्मिथवर असेल. स्मिथ नेहमीच भारताला त्रस्त करत आला आहे. दुसरीकडे, विराट मालिकेतील पहिला सामना खेळल्यानंतर पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतेल. तत्पूर्वी, या दोन समकालीन दिग्गजांत झालेल्या चर्चेचा एक व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.
ही आहे विराटची ऑस्ट्रेलियाविरुद्धची आवडती खेळी
यात स्मिथने विराटला त्याच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सर्वोत्तम खेळीविषयी विचारले. स्मिथने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना विराटने म्हटले,
“ऑस्ट्रेलियाविरुद्ध मी २०१६ टी२० विश्वचषकात खेळलेली खेळी सर्वोत्तम मानतो. ही खेळी माझ्या कायम जवळची असेल. कारण, ज्या परिस्थितीत ही खेळी खेळली गेली होती, ही परिस्थिती आव्हानात्मक होती. पाकिस्तानविरुद्ध केलेली १८३ खेळीदेखील खास आहे. मात्र, मोहालीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची ती खेळी खरोखरच वेगळी होती.”
विराटने केली होती मॅचविनिंग खेळी
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले होते. आव्हानाचा पाठलाग करताना भारताची परिस्थिती एक वेळ ९४-४ अशी झाली होती. भारताला अखेरच्या सहा षटकात ६७ धावा हव्या होत्या. विराटने कर्णधार एमएस धोनीसमवेत नाबाद भागीदारी करत भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला होता. या सामन्यात विराटने ८२ धावांची नाबाद खेळी करताना ९ चौकार व २ षटकार खेचले होते. या विजयानंतर भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
महत्वाच्या बातम्या:
– ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा; या खेळाडूला मिळाली संधी
– स्मिथच्या दुखापतीबाबत महत्वाची माहिती! कर्णधार टीम पेन म्हणाला
– एक नजर इकडेही टाका! १२० पेक्षा अधिक देशात पाहिली जाणार भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका






