---Advertisement---

कर्णधार असावा तर असा! अंगठ्यातून रक्त येत असतानाही दाखवली विराटने ‘हिम्मत’

On: गुरूवार, डिसेंबर 17, 2020 11:34 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला ऍडलेड येथे गुरुवारपासून (१७ डिसेंबर) सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ६ गडी गमावत २३३ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना खराब सुरुवातीनंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीचे मैदानात आगमन झाल्यानंतर भारतीय संघाच्या धावसंख्येला आकार मिळाला. कोहलीने ७४ धावा काढत भारताकडून पहिल्या दिवशी सर्वात्कृष्ट खेळ केला. मात्र, या खेळीदरम्यान कोहलीच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. तसेच अंगठ्यातून रक्त येत असतानाही, विराटने हिम्मत दाखवून मैदानावर उभा राहत कर्णधाराची जबाबदारी निभावली. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर विराटच्या या दुखापतग्रस्त अंगठ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कोहलीला झाली होती दुखापत
विराटने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत ७४ धावा काढल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कोहलीच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत स्पष्टपणे दिसून येत आहे की, कोहलीच्या अंगठ्यातून रक्त येत आहे. अशा परिस्थितीतही विराट त्यावेळी मैदानात उभा राहिला आणि संघाची जबाबदारी घेत एक उत्कृष्ट खेळी केली. मात्र, अजिंक्य रहाणेमुळे कोहलीला धावबाद होऊन परत माघारी परतावे लागले. कोहलीने १८० चेंडूंचा सामना करत ८ चौकारांच्या मदतीने ७४ धावा केल्या.

https://twitter.com/Navaneeth0309/status/1339627670917709824

भारतासाठी राहिला पहिला दिवस निराशजनक
पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी विराट कोहली नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्याचा हा निर्णय ऑस्ट्रेलियाचे अनुभवी गोलंदाज मिचेल स्टार्क व पॅट कमिन्स यांनी चुकीचा ठरवला. स्टार्कने दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉला भोपळाही न फोडता बाद केले. कमिन्सने दुसरा सलामीवीर मयंक अगरवालला १८ धावांवर बाद करून भारताला दुसरा धक्का दिला. तिसऱ्या गड्यासाठी चेतेश्वर पुजारा व विराट कोहली यांच्यात ६८ धावांची भागीदारी झाली. दुसऱ्या सत्राच्या अखेरीस १६० चेंडूंचा सामना करत ४३ धावांची संयमी खेळी करून पुजारा नॅथन लायनच्या गोलंदाजीवर बाद झाला.

पुजारा बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे अशी जोडी जमली. दोघांनीही चांगल्या धावगतीने धावा काढत ८८ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपायला १३ षटके शिल्लक असताना विराट दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. पाठोपाठ रहाणे ४२ व हनुमा विहारी ९ धावांवर परतल्याने भारताची अवस्था ६ बाद २०६ अशी झाली. यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि आर अश्विन यांनी आणखी पडझड होऊ न देता दिवसाखेर भारताची धावसंख्या २३३ पर्यंत नेली.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी साहा व अश्विन यांच्यावर भारताचा डाव पुढे नेण्याची जबाबदारी असेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन गोलंदाज भारताचा डाव लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करतील.

महत्त्वाच्या बातम्या-

दुर्दैव! तब्बल १७ वर्षानंतर भारतीय कर्णधारासोबत ऑस्ट्रेलियात घडली ‘अशी’ घटना

‘सर्व कसोटी सामन्यात केला पाहिजे ‘या’ चेंडूचा वापर’, महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे मत

दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला विराट; केली ‘ही’ अचाट कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---