मोहाली। आज(10 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 358 धावांचा डोंगर उभा केला आहे. भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवनने 193 धावांची सलामी भागीदारी रचत दमदार सुरुवात करुन दिली होती.
रोहितने 95 धावांची तर शिखर धवनने 143 धावांची खेळी केली. मात्र या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला विशेष काही करता आले नाही. तो 7 धावांवर असताना त्याला झाय रिचर्डसनने बाद केले.
विराट आज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. जवळ जवळ 4 वर्षांनंतर विराटने वनडेमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. याआधी शेवटचे 14 ऑक्टोबर 2015 मध्ये विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंदोर येथे वनडेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.
मात्र विराटने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केलेल्या मागील सहा सामन्यात त्याला 15 पेक्षा जास्त धावा करण्यात अपयश आले आहे. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शेवटच्या 6 सामन्यात 9, 4, 3*, 11, 12आणि 7 अशा धावा केल्या आहेत.
तसेच विराटने आत्तापर्यंत 41 वनडे सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्याची या क्रमांकावरील एकूण कामगिरी चांगली आहे. त्याने 7 शतके आणि 8 अर्धशतकांसह 56.48 च्या सरासरीने 1751 धावा केल्या आहेत.
विराट बऱ्याचदा वनडेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. पण आज केएल राहुल त्याच्या ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
–मोहाली वनडेत शानदार शतकी खेळी करणाऱ्या शिखर धवनने केले हे ५ गब्बर पराक्रम
–हिटमॅन रोहित शर्माचे शतक हुकले पण हा मोठा विश्वविक्रम झाला नावावर!
–टीम इंडिया आणि एमएस धोनीच्या बाबतीत पहिल्यांदाच घडली ही घटना