-अनिल भोईर
प्रो कबड्डी सीजन ७ अंतिम टप्पात येऊन पोहचला आहे. दबंग दिल्ली, बंगाल वारीयर्स, बेंगळुरू बुल्स व यु मुंबा या चार संघानी उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे.
सीजन ७ मध्ये दबंग दिल्लीच्या संघाने खूप चांगल्याप्रकारे खेळ दाखवला आहे. सर्वच खेळाडु तंदुरुस्त होते. नवीन कुमारची कामगिरी उल्लेखनीय होती. पण यासर्व खेळाडूंच्या फिटनेस मागे महत्वाचा वाटा होता तो त्याच्या फिजोओचा होता.
राष्ट्रीय फुटबॉल संघाचे फिजोओ म्हणून काम केलेले रसेल पिंटो हे प्रो कबड्डीमध्ये दबंग दिल्लीशी जोडलेले आहेत. सीजन ७ मध्ये खूप कमी खेळाडूंना दुखापती झाल्या. नक्की याचे काय कारण होते आणि दबंग दिल्लीच्या खेळाडूंच्या फिटनेस बाबतीत दबंग दिल्लीचे फिजीओ रसेल पिंटो यांनी महास्पोर्ट्स बरोबर केलेली खास बातचीत केली.
प्रो कबड्डी सीजन सुरू होण्याआधी खेळाडूंची कशाप्रकारे तयारी करून घेतली जाते ?
खेळाडूंच्या तयारीसाठी एक प्रक्रिया बनवली आहे, त्याप्रमाणे तयारी करून घेतो. प्रो कबड्डीच्या लिलावानंतर आमच्याकडे खेळाडूंची पूर्ण लिस्ट येते. प्रत्येक खेळाडूला कॉल करून त्याच्या फिटनेसबद्दल माहिती घेतो. कोणत्या खेळाडूला काही दुखापत वगैरे असेल, तर त्याना एक प्रोग्राम बनवून तो फोलो करायला सांगतो.
कॅम्प सुरू होण्याआधी प्रत्येक खेळाडु साठी एक फिटनेस प्रोग्राम दिलेला असतो. कॅम्प सुरू झाला की सुरुवातीला प्रत्येक खेळाडूंची फिटनेस टेस्ट घेतली जाते, त्यामुळे आम्हाला प्रत्येक खेळाडूंच्या कमतरता, त्याच्या दुखापती विषयी माहिती मिळते. त्यामुळे त्याच्या उणीवा भरून काढण्यासाठी मदत होते. खेळाडूच्या स्पीड, स्ट्रेनथ, स्टेबिलिटी यांवर अभ्यास केला जातो. प्रत्येक खेळाडूसाठी प्री सीजन प्रोग्राम दिलेलं असतो. जेणे करून सर्वांची फिटनेस सारखी व्हावी.
नवीन कुमारने या सीजनमध्ये खूप उल्लेखनीय कामगिरी केली आहे, नवीन सारख्या खेळाडूंसाठी काही विशेष तयारी केली आहे ?
नवीन कुमारची सुरुवातीपासून वेगळ्याप्रकारे तयारी करून घेतली होती. पण पोसिशन नुसार प्रत्येक रेडरची तयारी करून घेतली आहे. फक्त नवीनसाठीच विशेष असे काही नाही. हो पण प्रत्येक खेळाडू प्रमाणे नवीनचा प्रोग्राम तयार केला होता. नवीन जलद गतीने व चपळाईने रेड करणारा खेळाडू आहे. त्यामुळे त्याचा स्पीड मेंटेन करणे, जसा “कोयले मे से हिरा निकलना” तसेच काम सुरू असते. बाकी त्याच्या खेळावरती कोच काम करत असतात.
जोगिंदर आणि रविंदरसारखे दोन अनुभवी खेळाडू संघात आहेत. ते दोघेही तेवढेच फिट आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल?
याबद्दल सांगायचं म्हटलं तर येथे ‘स्पोर्ट्स सायन्स’ बद्दल थोडे समजून घेतले पाहिजे. युवा खेळाडू जसे की नवीन कुमार यांच्यासाठी आम्ही सर्व गोष्टीचे ट्रेनिंग देतो, त्याचा स्पीड वगैरे यावर लक्ष द्यायला सांगतो. पण वयाच्या तिशी पार केलेल्या खेळाडूंना फिटनेस व खेळाबद्दल खूप माहिती असते. फक्त अश्यावेळी फिजिओ प्रोटेक्टिव्ह रोलची भूमिका निभावतो.
त्या खेळाडूवर किती लोड आहे, त्यांचा शरीर त्याला साथ किती देताय यावर आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. बहुतेक सर्व प्रशिक्षकांचा प्रशिक्षणावर जास्त विश्वास असतो. पण आमचे प्रशिक्षक ‘स्पोर्ट्स सायन्स’ वरही तेवढेच विश्वास ठेवतात. जर एखाद्या खेळाडूला वाटत असेल की तो अनफिट आहे तर आम्ही त्याला विश्रांती द्या असे प्रशिक्षकाला सुचवतो. अशा खेळाडूंना स्ट्रेन्थ अँड कंडिशनिंग प्रशिक्षकाकडे ट्रेनिंगसाठी पाठवतो.
तुमच्या करियर बद्दल काय सांगाल?
मी एक फिजिओ आहे. सुरुवातीला फुटबॉल खेळापासून सुरुवात केली आहे. २०१२ पासून फुटबॉल खेळावर काम करत आहे. भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचाही फिजिओ म्हणून काम केलं आहे. २०१७ मध्ये फिफा १७ वर्षाखालील विश्वचषकात भारतीय संघाचा फिजिओ म्हणून काम केलं आहे. आजच्या दिवसाला एकमेव भारतीय फिजिओ ज्याने फिफाच्या स्पर्धेत काम केलं आहे.
कबड्डीमध्ये मी प्रो कबड्डी सीजन २ पासून जोडले गेलो. मागील २ वर्ष मी दबंग दिल्ली संघाबरोबर नव्हतो कारण तेव्हा फिफाच्या विश्वचषकासाठी गेलो होतो. त्यामुळे माझा अनुभव खूप आहे. जुन्या खेळाडूंसोबत मी काम केलं आहे. जेव्हा सीजन २ मध्ये कबड्डीमध्ये फिजिओ वगैरे अशा गोष्टींचा जास्त विचार केला जात नव्हता, तेव्हा आम्ही दबंग दिल्ली व जयपूर पिंक पँथर्सने हे काम करायला सुरुवात केली.
दबंग दिल्लीच्या टीमच्या व्यतिरिक्त कोणता संघ फिट वाटतोय?
सीजन ७ मध्ये दबंग दिल्ली नक्कीच फिट संघ आहे. पण मी दुसऱ्या संघाबद्दल जास्त काही सांगू नाही शकत, कारण त्यांच्याबद्दल माहिती नाही. पण सीजन ७ मध्ये सर्वच संघानी ‘स्पोर्ट्स सायन्स’ वापर केला आहे. त्यामुळे दुखापती खुप कमी झाल्यात. ज्या थोड्याफार झाल्यात त्या कॉन्टॅक्ट इन्जुरी आहेत. त्याला जास्त काही करू शकत नाही. पण कबड्डीमध्ये ‘स्पोर्ट्स सायन्स’चा उपयोग होत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे हा खेळ नक्कीच जागतिक पातळीवर जाईल.