---Advertisement---

केपीआयटी- एमएसएलटीए चॅलेंजर्स टेनिस स्पर्धेत दुहेरीत भारताच्या अर्जुन कढे व साकेत मायनेनी यांचा अंतिम फेरीत प्रवेश

On: रविवार, नोव्हेंबर 17, 2019 10:18 PM
---Advertisement---

पुणे। एमएसएलटीए व पीएमडीटीए आयोजित आणि एटीपी व एआयटीए यांच्या मान्यतेने होत असलेल्या केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्य फेरीत भारताचा राष्ट्रीय क्रमांक तीन व स्पर्धेतील सहावा मानांकित खेळाडू रामकुमार रामनाथनला ऑस्ट्रेलीयाच्या दुसऱ्या मानांकित जेम्स डकवर्थ यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलीयाच्या दुसऱ्या मानांकित जेम्स डकवर्थ व ग्रेट ब्रिटनच्या पाचव्या मानांकित जे क्लार्क यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी येथील टेनिस संकुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्य फेरीत पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत १ तास ३५ मिनिट चाललेल्या सामन्यात ऑस्ट्रेलीयाच्या दुसऱ्या मानांकित जेम्स डकवर्थ याने भारताचा राष्ट्रीय क्रमांक तीन व स्पर्धेतील सहावा मानांकित खेळाडू रामकुमार रामनाथनचा ७-६(८),६-२ असा टायब्रेकमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. रामकुमारने सामन्यात दमदार सुरुवात केली. मात्र रामकुमारला सामन्यात आपली पकड मजबूत ठेवता आली नाही. जेम्स डकवर्थ हा २०१० सालचा जुनिअर फ्रेंच ओपन सेमीफायनलिस्ट आहे.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत १ तास १७ मिनिट चाललेल्या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या २१ वर्षीय पाचव्या मानांकित जे क्लार्कने स्पेनच्या सातव्या मानांकित रोबेर्टो ओल्मेडो याचा ६-३,६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुहेरीच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारताच्या अर्जुन कढे व साकेत मायनेनी या तिसऱ्या मानांकित जोडीने जपानच्या तोशिहीदे मत्सुई व भारताच्या विष्णु वर्धन या दुसऱ्या मानांकित जोडीचा संघर्षपूर्ण लढतीत ५-७,७-६(१),१०-४ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुहेरीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारताच्या रामकुमार रामनाथन व पुरव राजा या जोडीने इंग्लंडच्या डन क्लेन व भारताच्या विजय सुंदर प्रशांत या चौथ्या मानांकित जोडीचा ६-४,७-५ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत भारताच्या अर्जुन कढे, साकेत मायनेनी व रामकुमार रामनाथन, पुरव राजा असा सामना रंगणार आहे.

एकेरी गट- उपांत्य फेरी

जेम्स डकवर्थ(2)(ऑस्ट्रेलीया) वि वि रामकुमार रामनाथन(६)(भारत)७-६(८),६-२
जे क्लार्क(5)(ग्रेट ब्रिटन) वि वि रोबेर्टो ओल्मेडो(७)(स्पेन) ६-३,६-२

दुहेरी गट- उपांत्य फेरी

अर्जुन कढे(भारत)/साकेत मायनेनी(भारत)(3) वि वि तोशिहीदे मत्सुई(जपान)/ विष्णु वर्धन(भारत)(2)५-७,७-६(१),१०-४

रामकुमार रामनाथन(भारत)/पुरव राजा(भारत) वि वि डन क्लेन(इंग्लंड)/विजय सुंदर प्रशांत(भारत)(4) ६-४,७-५

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---