महाराष्ट्रात मागच्या जवळपास पंधरा दिवसापासून एका गोष्टीची सर्वात जास्त चर्चा होती ती म्हणजे राज्यसभा निवडणूक. कारण महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्यसभा निवडणूक लागलेली. जागा होत्या सहा. साऱ्या राजकीय पक्षांचे मिळून ५ खासदार फिक्स निवडून येणार होते, पण एका जागेवर घोड घडलं आणि निवडणूक बिनविरोध झाली. प्रत्यक्ष मतदान झालं तेव्हा एक अभूतपूर्व गोंधळ झाला आणि निकाल मध्यरात्री लागला. सहाव्या जागेची ही लढत थेट दोन कोल्हापूरकरांत होती. एक शिवसेनेचे संजय पवार आणि दुसरे भाजपचे धनंजय महाडिक. अखेर महाडिक यांना विजयश्री प्राप्त झाली आणि कोल्हापुरात गुलाल उधळून आनंद साजरा करण्यात आला.
महाडिक यांच्या या विजयानंतर एक नाव देखील चर्चेत आलं ते म्हणजे कृष्णराज महाडिक. धनंजय महाडिक यांचा मुलगा. कारण या कृष्णराजने निवडणुकीच्या आधीच डॅडच जिंकणार होता असा आत्मविश्वास व्यक्त केलेला. सोबतच महाडिकांच्या विजयानंतर बाप-लेकाचा एक आनंदाश्रूसह मिठी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. परंतु, फक्त धनंजय महाडिक यांचा पुत्र अशीच कृष्णराजची ओळख आहे का? तो नक्की काय करतो? तो अचानक चर्चेत का आला? याची उत्तरे देणारा हा विशेष लेख.
महाडिक हे तीन पिढ्यांपासून राजकारणात असलेलं कोल्हापूरचं घराण. धनंजय महाडिक २०१४ ला लोकसभेवर निवडून गेलेले. अमल महाडिक हे देखील आमदार राहिलेले. आता घरात राजकारणाचा वसा आहे म्हटल्यावर पुढची पिढी देखील तिकडे जाणार, असंच साऱ्यांना वाटलं असेल. पण, धनंजय महाडिक यांचा दोन नंबरचा सुपुत्र कृष्णराजने राजकारणाचा आखाडा सोडून खेळाच्या मैदानात उडी घेतली. आणि खेळही साधासुधा नव्हे डायरेक्ट रेसिंग. कोल्हापूरी भाषेत सांगायचं झालं तर, एकदम खोल विषय.
हेही पाहा- गल्ली-दिल्ली सोडा थेट परदेशात नाव गाजवलेला कृष्णराज महाडिक
आता कोल्हापुरात राहून कृष्णराजला रेसिंगचा नाद लागला कसा? २००८ मध्ये कृष्णराज १० वर्षाचा असताना त्याच्या एका मित्राच्या वडिलांनी कोल्हापुरात गो कार्ट रेसिंग सुरू केली. त्याने ते पाहिलं आणि रेसिंगच्या अक्षरशः प्रेमात पडला. गो कार्टिंग करू लागला. मात्र, गो कार्टिंग करताकरता त्याला इतर खेळांची आवड होती, ती देखील त्याने अजिबात कमी होऊ दिली नाही. तसं बघायला गेलं तर त्याच्या रक्तातच खेळ होता. आजोबा भीमराव महाडिक कोल्हापुरातील नामांकित पैलवान. महाबली दारासिंगशी त्यांनी दोन हात केलेले. खासदार धनंजय महाडिक स्वतः कुस्ती आणि बॉक्सिंगचे नॅशनल चॅम्पियन आहेत. त्यांच्या पत्नी अरुंधती यादेखील नॅशनल बास्केटबॉल प्लेयर राहिल्यात. त्यात कोल्हापुरात कुस्ती आणि फुटबॉलचा एक समृद्ध वारसा आहेच.
कृष्णराज फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, स्विमिंग, स्केटिंग या सार्याच खेळात पारंगत झालेला. एवढेच काय महाराष्ट्रासाठी नॅशनल लेवलला फुटबॉल आणि बॅडमिंटन पण खेळला. पण, गो कार्टिंगमुळे वळलेला रेसिंगचा किडा त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. रेसिंगमध्ये काहीतरी करायचंच अस त्याच्या डोक्यात होत. तो इरेला पेटलेला.
तो अगदी जिद्दीने रेसिंगचा सराव करू लागला. २०१२ आणि २०१३ मध्ये त्याने रेसिंगमध्ये पहिली अचीवमेंट मिळवली. रोटॅक्स मॅक्स ग्रँड फायनलमध्ये तो सहभागी झाला. कार्टिंग विश्वातील ही एक मानाची रेस मानली जाते. आणि ती रेस खेळणारा तो पहिला भारतीय होता. १४ वर्षांचा झाला तेव्हा तो नॅशनल गो कार्टिंग चॅम्पियन बनलेला. आवड आता पॅशन बनलेली. आता कार्टिंग सोडून वन लेवल अप जायचा विचार त्याच्या मनात आला. डायरेक्ट फॉर्म्युला वनच्या ट्रॅकवर त्याने आपली गाडी आणली.
भारतातलं एकमेव फॉर्म्युला वन रेसिंग ट्रॅक असलेल्या नोएडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर २०१५ मध्ये तो पहिली फॉर्मुला फोर रेस खेळायला उतरला. रेस होती नॅशनल चॅम्पियनशिपची. त्या ट्रॅकवर अशी काय या कोल्हापुरकराची गाडी बुंगाट पळाली की, सरळ तिसरं प्राईज घेऊन आली. भारताच रेसिंग दुनियेत नाव नाव उदयाला येत होतं कृष्णराज महाडिक. म्हणतात ना यशाचा दरवळ पसरायला वेळ लागत नाही, अगदी तसच कृष्णराजसोबत झालं. फॉर्मुला थ्री मधली मोठी रेसिंग कंपनी असलेल्या ख्रिस डिटमंड रेसिंग त्याला शोधत भारतात आली आणि त्याच्याशी करार केला. कृष्णराज इंग्लंडला पोहोचला.
डिटमनने त्याला इंग्लंडला नेले खरं पण कृष्णराजचा २०१६ ब्रिटिश फॉर्मुला थ्री सिझन अपेक्षेप्रमाणे राहिला नाहीच. त्याला अपयशाला सामोर जावे लागले. मात्र, पुढच्या वर्षी डबल आर रेसिंग टीमने त्याच्यावर विश्वास दाखवला. केंटच्या ब्रॅंड हॅच ग्रँड प्रिक्स फार्मूला थ्रीमध्ये रेसिंग करायला कृष्णराज उतरला. पोल पोझिशनमध्ये त्याचं स्थान होतं अठराव. म्हणजे तो सुरुवात अठराव्या नंबरवरून करत होता. पण त्यादिवशी त्याची गाडी अशी काही बुंगाट अन् धुरळा उडवत पळाली की, कृष्णराज चॅम्पियन बनला. इंडियन फॉर्म्युला वन ड्रायव्हर नरेन कार्तिकेयननंतर तब्बल १९ वर्षांनंतर कोणीतरी त्या पोडियमच्या मध्यभागी होता. कोल्हापूरच्या मातीत तयार झालेल्या या रांगड्या तरुणान इतिहास रचला होता. पुढचा सिझन पण त्याच्यासाठी चांगला गेला. बऱ्याच रेसमध्ये कृष्णराज पोडियमवर दिसला.
पुढे लॉकडाऊन पडलं आणि कृष्णराज कोल्हापुरात परत आला. घरात बोर होत म्हणून, घरातल्याच गमतीजमती दाखवायला त्याने ‘क्रिश महाडिक’ नावाचं यूट्यूब चैनल सुरू केलं. त्याचा मिडास टच इथेही दिसला. युट्युबच सिल्वर बटन त्याला मिळालय. फुटबॉलप्रेमी असलेला कृष्णराज चॅम्पियन्स लीग आणि युरो कपची फायनल बघायला इंग्लंडला गेलेला. आपली आई अरुंधती यांच्यासोबत मिळून, कोल्हापुरात वुमेन्स फुटबॉलच्या मॅचेस कृष्णराजने सुरू केल्यात. कोल्हापुरातील सर्वात मोठी फुटबॉल लीग आयोजित करून कोल्हापूर फुटबॉलचा चेहरामोहरा बदलायच स्वप्न त्यान पाहिलंय.
सहसा राजकारण्यांची, आमदार-खासदारांची पोर खेळाच्या मैदानावर दिसत नाहीत. मात्र, कृष्णराजने वेगळा ट्रॅक पकडला आणि त्यात यशस्वी देखील होऊन दाखवलं. आता त्याच्या यशाची ही गाडी भविष्यात फॉर्म्युला वन ट्रॅकवरही अशीच सुसाट धावावी असेच प्रत्येक कोल्हापूरकराला आणि भारतीयाला वाटत असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रणजीच्या रणांगणात कोण मारणार बाजी? मुंबईकडे ४२वे जेतेपद जिंकण्याची संधी
आर्थिक संकटात अडकलेल्या श्रीलंकेला आता फक्च क्रिकेटच वाचवू शकतं, कसं ते वाचा सविस्तर
ज्या दाऊदला पाहून सर्वांची टरकते, त्याला कपिल पाजींनी शिकवलेला चांगलाच धडा, काय होता तो किस्सा?