मंगळवार रोजी (२८ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा तिसरा डबल हेडर झाला. यातील दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रंगला. या सामन्यात प्रथम गोलंदाजी निवडत मुंबईच्या खेळाडूंनी सुरुवातीपासून पंजाबला बॅकफूटवर ठेवले. पंजाबच्या डावादरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबरोबरच अष्टपैलू कायरन पोलार्ड आणि कृणाल पंड्या यांनीही विकेट्स काढल्या. त्यातही कृणालने पंजाबच्या सलामीवाराला बाद करत मोठ्या विक्रमांस गवसणी घातली आहे.
प्रथम फलंदाजीस उतरलेल्या पंजाब संघाकडून या सामन्यात केएल राहुलबरोबर मयंक अगरवाल नव्हे तर मनदीप सिंग सलामीला फलंदाजीसाठी आला होता. या २९ वर्षीय फलंदाजाने राहुलसोबत मिळून पहिल्या विकेटसाठी केवळ ३६ धावांची भागिदारी केली. डावातील सहावे षटक टाकण्यासाठी आलेल्या कृणालने दुसऱ्या चेंडूवर मनदिपला पायचित करत पंजाबला पहिला धक्का दिला. १४ चेंडूंमध्ये २ चौकारांच्या मदतीने १५ धावा करत मनदीप पव्हेलियनला परतला.
या विकेटसह कृणालने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ५० विकेट्स पूर्ण केल्या. विकेट्सचे हे अर्धशतक करत त्याने अष्टपैलूंच्या एका विक्रमांत आपलेही नाव जोडले आहे. आयपीएलमध्ये १००० धावा आणि ५० विकेट्स घेण्याचा हा विक्रम आहे. असा विक्रम करणारा कृणाल केवळ तिसराच भारतीय आणि आठवा खेळाडू बनला आहे.
त्याने ८२ व्या आयपीएल सामन्यामध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याच्या खात्यात ११२१ धावा आणि ५० विकेट्सची नोंद आहे. कृणालव्यतिरिक्त आयपीएलमध्ये हा किर्तीमान आपल्या नावावर करणाऱ्या भारतीय अष्टपैलूंमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सक्रिय खेळाडू रविंद्र जडेजा याचे नाव आहे. तसेच इरफान पठानचाही या यादीत समावेश आहे. तर परदेशी अष्टपैलूंमध्ये शेन वॉटसन, जॅक्स कॅलिस, आंद्रे रसेल, ड्वेन ब्रावो यांचेही नाव आहे. याबरोबरच कृणालचा संघ सहकारी कायरन पोलार्डने सुद्धा हा विक्रम केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितसारखा दिसणारा व्यक्ती पाकिस्तानात पितोय सरबत; फोटोने वेधले सोशल मीडियाचे लक्ष
वनडे क्रमवारी: मिताली राजने गमावला अव्वल क्रमांकाचा ताज, पण झूलन गोस्वामीची मोठी झेप
विकेट गेल्याच्या संतापात अश्विनची गोलंदाज साऊथीशी बाचाबाची, मग पंत-मॉर्गनमध्येही जुंपली, अखेर…