---Advertisement---

मोठी बातमी! इंग्लंडविरुद्ध कृणाल पंड्यासह ‘या’ भारतीय खेळाडूने केले वनडे पदार्पण

On: मंगळवार, मार्च 23, 2021 1:18 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना आज (२३ मार्च) पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. तत्पुर्वी उभय संघात नाणेफेक झाली असून नाणेफेकीचा कौल इंग्लंड संघाच्या बाजूने लागला आहे. इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. या सामन्याद्वारे २ नवोदित खेळाडूंचे वनडे पदार्पण झाले आहे.

भारताचा अष्टपैलू कृणाल पंड्या आणि गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांचा यात समावेश आहे. कृणाल भारताकडून वनडेत पदार्पण करणारा २३३ वा खेळाडू ठरला आहे. तर प्रसिद्ध २३४ वा खेळाडू ठरला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कृणालने नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत वनडे स्वरुपातील आपली क्षमता दाखवून दिली आहे. त्याने २०२०-२१ च्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत बडोदा संघासाठी सर्वाधिक ३८८ धावा करत भारतीय वनडे संघात जागा मिळवली आहे.

कृणाल पंड्याची कामगिरी-
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये बडोदा संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कृणालने २०१४ मध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत एकूण ६६ सामने खेळले आहेत. यात त्याने १९८३ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने ११ अर्धशतक आणि २ शतकदेखील झळकावले आहे. यासोबतच त्याने ८० गडी देखील बाद केले आहेत.

कृणालने २०१६ मध्ये आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघात पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय टी-२० संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याने आपला पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना वेस्ट इंडिज संघाविरुद्ध २०१८ मध्ये खेळला होता. त्या सामन्यात त्याने ४ षटक गोलंदाजी करत ३.७५ च्या इकॉनॉमी ने १५ धावा देत १ गडी बाद केला होता.

प्रसिद्ध क्रिष्णाची कारकिर्द-
प्रसिद्ध क्रिष्णा आजपर्यंत ९ प्रथम श्रेणी सामने, ४० अ दर्जाचे सामने व ४८ ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३४, अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ८१ व ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ३३ विकेट्स घेतल्या आहेत. २५ वर्षीय प्रसिद्धने आयपीएलमध्ये २४ सामन्यात १८ बळी घेतले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---