---Advertisement---

बांगलादेशचे टीम इंडियासमोर सपशेल लोटांगण! दुसऱ्या दिवशी कुलदीप-सिराजचा कहर

On: गुरूवार, डिसेंबर 15, 2022 5:34 PM
---Advertisement---

बांगलादेश आणि भारत यांच्या दरम्यान चट्टोग्राम येथे सुरू असलेल्या पहिला कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवशी श्रेयस अय्यर व चेतेश्वर पुजारा यांनी दाखवलेल्या शानदार खेळानंतर भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी गोलंदाजांच्या बळावर सामन्यावर आपली पकड मजबूत केली. संघात पुनरा आगमन करत असलेल्या कुलदीप यादव याने चार बळी घेत भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व केले.

 

पहिल्या दिवशी भारतीय संघाने ‌‌‌‌‌273 पर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशीचा नाबाद फलंदाज श्रेयस केवळ चार धावांची भर घालून वैयक्तिक 86 धावांवर माघारी परतला. रविचंद्रन अश्विन याने 58 तर कुलदीप यादवने 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारतीय संघाला 404 अशी मजल मारून दिली. बांगलादेश साठी तैजुल इस्लाम व मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी चार बळी मिळवले.

आपल्या पहिल्या डावात फलंदाजासाठी उतरलेल्या बांगलादेश संघाला सुरुवातीपासून धक्के बसले. सिराजने शांतो याला पहिल्या चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला. तर उमेशने यासीर अली याला आपल्या दुसऱ्या षटकात बाद केले. लिटन दास, झाकीर हुसेन व‌ मुशफीकुर रहिम या सुरुवात मिळालेल्या सर्व फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले. कर्णधार शाकीब अल हसन हा केवळ तीन धावा करू शकला. भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करत असलेल्या मोहम्मद सिराजने उमेश यादवसह आग ओकणारी गोलंदाजी केली.  सिराजने तीन फलंदाजांना बाद केले. तर, प्रदीर्घ काळानंतर कसोटी संघात जागा मिळवलेल्या फिरकीपटू कुलदीप यादव याने चार बळी मिळवत बांगलादेशचा डाव रोखला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस बांगलादेशने 8 बाद 133 अशी मजल मारली होती. भारतीय संघाकडे अद्याप 271 धावांची आघाडी असून, बांगलादेशला लवकरात लवकर सर्वबाद करण्याचा प्रयत्न भारतीय गोलंदाज करतील.

(Kuldeep And Siraj Shine In Day Of Chattogram Test)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---