मँचेस्टरमध्ये झालेल्या थरारक ड्रॉनंतर आता संपूर्ण लक्ष लंडनच्या ओव्हलवर लागलं आहे. 31 जुलैपासून सुरू होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतासाठी सन्मानाची लढत आहे. ही मॅच जिंकली, तर टीम इंडिया मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधू शकेल आणि पराभव टाळू शकेल. मात्र संघ निवडीचं कोडं सोडवणं ही कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गंभीर यांच्यासमोरची मोठी जबाबदारी ठरणार आहे. एकीकडे दुखापती, दुसरीकडे वर्कलोड आणि योग्य टीम संयोजन या सगळ्यांचा मेळ बसवणं हेच सर्वात कठीण गणित आहे.
ओव्हलचं मैदान स्पिनर्सना साथ देणारं मानलं जातं. त्यामुळे कुलदीप यादवला अंतिम 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. पण वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनी मागील मॅचमध्ये जोरदार फलंदाजी केली होती, त्यामुळे त्यांना बाहेर ठेवणं कठीण आहे. दरम्यान भारत तीन फिरकीपटूंना घेऊन उतरू शकतो. दुसरीकडे वेगवान गोलंदाजीत अर्शदीप सिंह दुखापतीतून सावरून फिट झाला असून अंशुल कम्बोजच्या जागी त्याचा समावेश जवळपास ठरलेला आहे. बुमराह, सिराज आणि अर्शदीप ही दमदार पेस तिकडी मैदानात उतरू शकते.
या सामन्यात ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेलची विकेटकीपर म्हणून निश्चित निवड झाली आहे. तो सातव्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि यष्टीमागेही आपल्या कौशल्याचं प्रदर्शन करेल. अशात अंशुल कम्बोज आणि शार्दुल ठाकूर यांना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावं लागू शकतं. एकंदरीत भारत सुंदर, जडेजा आणि कुलदीपसारख्या तीन फिरकीपटूंना घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता असून, सामन्यापूर्वी अंतिम संघरचना जाहीर होईल. आता पाहायचं म्हणजे शेवटच्या सामन्यात भारत पराभवाची किनार ओलांडून विजयाच्या शिखरावर पोहोचतो का यावर सगळ्यांच लक्ष आहे.





