विशाखापट्टणम। आज(18 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने(Kuldeep Yadav) हॅट्रिक(hat-trick) घेतली आहे. याबरोबरच एक मोठा विक्रम केला आहे.
या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 388 धावांचे आव्हान ठेवले आहे. मात्र या आव्हानाचा वेस्ट इंडिज पाठलाग करत असताना 33 व्या षटकात कुलदीप यादवने सलग तीन चेंडूत तीन विकेट घेत हॅट्रिक घेतली.
त्याने या षटकातील चौथ्या चेंडूवर 78 धावांवर खेळणाऱ्या शाय होपला बाद केले. होपचा झेल भारताचा कर्णधार विराट कोहलीने घेतला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर कुलदीपने जेसन होल्डरला बाद केले. होल्डरला यष्टीरक्षक रिषभ पंतने चपळाईने यष्टीचीत केले. त्यानंतर या षटाकातील शेवटच्या चेंडूवर कुलदीपने अल्झारी जोसेफला बाद केले. जोसेफचा झेल केदार जाधवने घेतला.
या हॅट्रिकमुळे कुलदीप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच वनडेत 2 किंवा त्यापेक्षा अधिक हॅट्रिक घेणारा जगातील एकूण 6 वा गोलंदाज ठरला आहे. कुलदीपने याआधी 2017मध्ये कोलकाताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात हॅट्रिक घेतली होती.
आत्तापर्यंत लसिथ मलिंगाने(Lasith Malinga) वनडेत सर्वाधिक 3 वेळा हॅट्रिक घेतली आहे. तसेच वासिम आक्रम(Wasim Akram), सक्लेन मुश्ताक(Saqlain Mushtaq), चामिंडा वास(Chaminda Vaas) आणि ट्रेंट बोल्ट(Trent Boult) यांनी 2 वेळा वनडे हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे.
#वनडेमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेणारे गोलंदाज –
3 – लसिथ मलिंगा
2 – वासिम आक्रम
2 – सक्लेन मुश्ताक
2 – चामिंडा वास
2 – ट्रेंट बोल्ट
2 – कुलदीप यादव
#वनडेमध्ये हॅट्रिक घेणारे भारतीय गोलंदाज –
चेतन शर्मा – विरुद्ध न्यूझीलंड, नागपूर, 1987
कपिल देव – विरुद्ध श्रीलंका, कोलकाता, 1991
कुलदीप यादव – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कोलकाता, 2017
मोहम्मद शमी – विरुद्ध अफगाणिस्तान, साऊथँप्टन, 2019
कुलदीप यादव – विरुद्ध वेस्ट इंडिज, विशाखापट्टणम, 2019






