भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका अर्थात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी १७ डिसेंबरपासून सुरू होतेय. भारत या प्रतिष्ठित मालिकेचा गतविजेता आहे. भारताने २०१८-२०१९ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळताना ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत करत प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा कारनामा केला होता. मात्र, त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात अनुभवी स्टीव स्मिथ व डेविड वॉर्नर यांचा समावेश नव्हता. त्यामुळे, भारताने मिळवलेला हा विजय एक नशिबाचा भाग होता, अशी टीका अनेकांनी केले होती. त्याच अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याने टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.
कसोटी मालिका नशिबाने जिंकता येत नाहीत
केकेआर डॉट इन या कोलकत्ता नाइट रायडर्सच्या अधिकृत संकेतस्थळाशी बोलताना कुलदीपला मागील दौर्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना कुलदीप म्हणाला, “कोणतीही कसोटी मालिका नशिबाच्या जोरावर जिंकता येत नाही. तुम्हाला मालिका जिंकण्यासाठी सलग कसोटी सामने जिंकणे आवश्यक असते. आम्ही त्या मालिकेत २ सामने जिंकलो होतो, पावसाने व्यत्यय आणला नसता तर आम्ही तिसरा सामनाही जिंकला असता. त्यामुळे आमच्या संघाच्या कामगिरीवर बोटे ठेवण्याचा काही आधार नाही. विरोधी संघ कमकुवत होता, यापेक्षा तुमचा संघ कसा खेळला याला महत्त्व मिळाले पाहिजे. आमच्या फलंदाजांनी मोठमोठ्या धावसंख्या उभारल्या आणि गोलंदाजांनी बळी मिळवले होते. आम्ही तेव्हाही जिंकलो होतो आणि यावेळीही जिंकू.”
भारताने जिंकलेल्या त्या मालिकेत कुलदीप यादव विजयी संघाचा सदस्य होता. त्या मालिकेत भारताने दोन सामने जिंकले होते. मालिकेतील अखेरच्या सामन्यात पाऊस आला नसता तर, कदाचित भारताने ती मालिका ३-१ अशा फरकाने आपल्या नावे केली असते.
आगामी मालिका रंगतदार होणार
यावेळच्या मालिकेविषयी बोलताना कुलदीपने सांगितले, “स्टीव स्मिथ, डेविड वॉर्नर आणि मार्नस लॅब्युशेन यांच्या आगमनानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ मागील वेळेपेक्षा अधिक मजबूत आणि अनुभवी दिसत आहे. पण, ऑस्ट्रेलियाचा संघही मागील वेळीही मजबूतच होता आणि आम्ही चांगले क्रिकेट खेळून मालिका जिंकली होती. यावेळीदेखील चाहत्यांना मैदानावर चांगली लढत पाहायला मिळणार आहे. मालिका रंगतदार होईल.”
मर्यादित षटकांच्या मालिकांनंतर उभय संघांमध्ये १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथील पहिल्या दिवस-रात्र कसोटीने मालिकेची सुरुवात होईल. मालिकेपूर्वी खेळलेल्या दोन सराव सामन्यांपैकी एकात विजय मिळवून भारतीय संघाने आत्मविश्वास कमावला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली पहिली कसोटी खेळल्यानंतर, पालकत्व रजा घेऊन मायदेशी रवाना होईल. त्याच्या जागी अजिंक्य राहणे उर्वरित सामन्यात भारताचे नेतृत्व करेल.
संबंधित बातम्या:
– भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघात मोठ्या खेळाडूचे पुनरागमन; फलंदाजांच्या दांड्या गुल करण्यास सज्ज
– ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत हे ३ गोलंदाज लढवणार भारताची खिंड; स्पिनरचाही समावेश
– कसोटी मालिकेत स्लेजिंग तर होणारच! ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाचे विधान