इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा लिलाव गुरवारी चेन्नई येथे पार पडला. या लिलावात दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरीस १६.२५ कोटी रुपयांची बोली लागल्याने सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. लिलावादरम्यान त्याला खरेदी करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. मात्र अखेर विक्रमी बोली लावत राजस्थानने मॉरीसला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
मात्र लिलाव संपल्यानंतर राजस्थानने मॉरीसला इतक्या विक्रमी किमतीत का विकत घेतले, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता संघाचा प्रशिक्षक असलेल्या कुमार संगकारानेच या गोष्टीचा खुलासा केला आहे. संगकाराने मॉरीसला काहीशा अधिक किमतीने खरेदी केले गेले असल्याचे मान्य केले. मात्र सामना संपवण्याच्या त्याच्या कलेमुळे मॉरीसला प्राधान्य दिल्याचे त्याने स्पष्ट केले.
“मॉरीसला विशिष्ट हेतूने खरेदी केले”
संगकारा म्हणाला, “आम्ही ख्रिस मॉरीसच्या समावेशाने अतिशय खुश आहोत. कारण त्याच्या संघातील समावेशाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर समतोल साधला जातो. विशेषतः त्याने आयपीएलमध्ये अतिशय शानदार प्रदर्शन केले आहे आणि फलंदाजीत सामना एकहाती संपवण्याची त्याची क्षमता आमच्या कामी येणार आहे. त्याला काहीशा अधिक भावाने खरेदी केले गेले असले तरी त्याच्यासाठी एक विशिष्ट भूमिका आम्ही ठरवली आहे. त्याच्यासारख्या खेळाडूच्या समावेशाने आम्ही निश्चितच आनंदी आहोत.”
राजस्थानच्या संघाने या लिलावात भारतीय अष्टपैलू शिवम दुबेलाही ४.४ कोटी रुपयांची बोली लावत संघात समाविष्ट केले. याबाबत बोलताना संगकारा म्हणाला, “हा लिलाव आमच्यासाठी अतिशय समाधानकारक होता. आम्ही काही विशिष्ट खेळाडू शोधत होतो. आणि त्यांना सामील करून घेऊ शकल्याने आनंदी आहोत. आम्हला मधल्या फळीत शिवम दुबे सारख्या खेळाडूंची गरज होती आणि आम्ही त्याला सामील करून घेण्यात यशस्वी ठरलो. याशिवाय काही गुणवान युवा खेळाडूही ताफ्यात दाखल झाल्याने आम्ही समाधानी आहोत.”
राजस्थान रॉयल्सने लिलावात खरेदी केलेले खेळाडू –
ख्रिस मॉरिस (१६.२५ कोटी), शिवम दुबे (४.४० कोटी), चेतन साकारिया (१.२० कोटी), मुश्तफिजुर रेहमान(१ कोटी), लियाम लिविंगस्टोन (७५ लाख), केसी कारिप्पा (२० लाख), आकाश सिंग (२० लाख), कुलदीप यादव (२० लाख)
महत्वाच्या बातम्या:
शाकिब-भज्जीची अनुभवी फिरकी जोडी केकेआरला जिंकून देणार जेतेपद? पाहा संघातील सर्व खेळाडूंची यादी
आयएसएल २०२०-२१ : कोलकता डर्बी जिंकत एटीके मोहन बागानची आघाडी भक्कम