धरमशाला। श्रीलंका संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात श्रीलंकेला ३ सामन्यांची टी२० आणि २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यातील भारत आणि श्रीलंका संघातील (India vs Sri Lanka) टी२० मालिका (T20I Series) शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) सुरू झाली आहे. टी२० मालिकेतील अखेरचे दोन सामने धरमशाला येथे होणार आहेत. पण या सामन्यांपूर्वीच श्रीलंकेला दुहेरी धक्का बसला आहे.
श्रीलंका संघातील कुशल मेंडिस (Kusal Mendis) आणि महिश तिक्षणा (Maheesh Theekshana) हे दोन खेळाडू भारताविरुद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर झाले आहेत. हे दोघेही दुखापतीमुळे टी२० मालिकेसाठी उपलब्ध नसतील. याबद्दल श्रीलंका क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी माहिती दिली आहे.
दरम्यान, कुशल मेंडिसचा ४ मार्चपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी १८ जणांच्या श्रीलंका संघात समावेश करण्यात आला आहे. असे असले तरी, त्याची उपलब्धता त्याच्या तंदुरूस्तीवर अवलंबून असणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाला आशा आहे की, कुशल मेंडिस कसोटी मालिकेपूर्वी बरा होईल.
कुशल मेंडिस आणि महिश तिक्षणा ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेतील अखेरचा सामना खेळताना दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे ते भारताविरुद्ध पहिला सामना देखील खेळले नव्हते. आता ते भारताविरुद्धच्या उर्वरित २ टी२० सामन्यातूनही बाहेर झाले आहेत. त्यांच्याऐवजी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने धनंजय डी सिल्वा आणि निरोशान डिकवेल्ला यांची बदली खेळाडू म्हणून संघात निवड केली आहे.
दुसरीकडे, या मालिकेला श्रीलंकेचा प्रमुख गोलंदाज वनिंदू हसरंगा मुकला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी२० मालिकेदरम्यान त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तो आता थेट श्रीलंकेला परत जाणार आहे.
त्याचबरोबर, श्रीलंकेसाठी चांगली बातमी अशी की, गोलंदाज बिनुरा फर्नांडो आता सरावासाठी फिट झाला असून तो भारताविरुद्धच्या उर्वरित २ टी२० सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे.
भारताविरुद्धच्या टी२० मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी श्रीलंका संघ
पाथम निसंका, कामिल मिश्रा, जेनिथ लियानागे, चारिथ असलंका, दिनेश चंडीमल(यष्टीरक्षक), दसुन शनका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रमा, जेफ्री वेंडरसे, लाहिरू कुमारा, धनंजय डी सिल्वा, निरोशान डिकवेल्ला, दनुष्का गुलतिलका, बिनुरा फर्नांडो, अशियान डॅनियल, शिरान फर्नांडो.
महत्त्वाच्या बातम्या –
चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र मंडळ, डेक्कन चार्जर्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश