सिंगापूरमध्ये रविवारी (31 मे) आशियाई क्रीडा (एशियन गेम्स) स्पर्धेच्या पुरुष टी20 आंतरराष्ट्रीय पात्रता फेरीला जबरदस्त सुरूवात झाली. पहिला सामना नेपाळ विरुद्ध चीन असा खेळला गेला, ज्यामध्ये नेपाळने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत 20 षटकांत 2 विकेट्स गमावत 313 धावसंख्या उभारली. यामध्ये त्यांचा सलामीवीर कुशल भुर्तेलचे धमाकेदार शतक करत दिग्गज युवराज सिंगच्या विशेष विक्रमाची बरोबरी केली आहे.
या सामन्यात चीनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा हा निर्णय चांगलाच चुकल्याचे लक्षात आले. भुर्तेलने चीनच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला आणि चेन झुओ युए याच्या एका षटकात सलग सहा षटकार मारले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात महाग षटक ठरले, कारण चेनने सामन्याच्या या 9व्या षटकात सहा षटकार आणि एका वाईडसह एकूण 37 धावा दिल्या. त्याचबरोबर भुर्तेल पुरुषांच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका षटकात सहा षटकार ठोकणारा पाचवा फलंदाज ठरला आहे.
कुशलने यावेळी 43 चेंडूंत 5 चौकार आणि 16 षटकारांसह 129 धावा केल्या.
पुरुषांच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका षटकात सहा षटकार ठोकणारे खेळाडू
युवराज सिंग (भारत) विरुद्ध इंग्लंड, 2007 – 36 धावा (6, 6, 6, 6, 6, 6)
कायरन पोलार्ड (वेस्ट इंडीज) विरुद्ध श्रीलंका, 2021 – 36 धावा (6, 6, 6, 6, 6, 6)
दीपेंद्र सिंग ऐरी (नेपाळ) विरुद्ध कतार, 2024 – 36 धावा (6, 6, 6, 6, 6, 6)
मनन बशीर (बल्गेरिया) विरुद्ध जिब्राल्टर, 2025 – 36 धावा (6, 6, 6, 6, 6, 6)
कुशल भुर्तेल (नेपाळ) विरुद्ध चीन, 2026 – 36 धावा (6, 6, 6, 6, 6, 6)
आता पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये एका षटकात सहा षटकार मारणाऱ्या फलंदाजांची संख्या ७ झाली आहे.
2007 मध्ये वनडे विश्वचषकात नेदरलॅंड्स विरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या हर्शेल गिब्जने आणि 2021 मध्ये यूएसएच्या जसकरण मल्होत्राने पीएनजी विरुद्धच्या वनडे सामन्यात एका षटकात सहा षटकार मारले होते.
नेपाळच्या दीपेंद्र सिंग ऐरीने आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दोनदा सलग सहा षटकार ठोकले आहेत, मात्र पहिल्यांदा त्याने हे दोन षटकांमध्ये केले होते. त्यातील एका षटकात सलग पाच आणि पुढच्या षटकात सहावा षटकार मारला होता.
सामन्याची स्थिती पाहिली तर नेपाळची ही पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमधील तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. पहिल्या स्थानी झिम्बाब्वे असून त्यांनी 2024 मध्ये गाम्बिया विरुद्ध 344 धावा केल्या होत्या. दुसऱ्या स्थानी नेपाळच असून त्यांनी 2023 मध्ये मंगोलिया विरुद्ध 314 धावा केल्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना चीनचा संघ 19.2 षटकांत 92 धावा करत गारद झाला आणि नेपाळने हा सामना 221 धावांनी जिंकला.






