आयपीएलमध्ये गुरुवारी किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांदरम्यान सामना झाला. या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने 69 चेंडूत 132 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे पंजाबला मोठी धावसंख्या उभारता आली. त्याच्या या खेळीचं सध्या जोरदार खूप कौतुक होत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानेही केएल राहुलचे कौतुक केले आहे. त्याने क्रिकइन्फो या वेबसाईटशी बोलताना राहुलला दिग्गज कर्णधार म्हटले आहे.
“ कर्णधार म्हणून बरेच उतार चढाव येतात, पण मला वाटते राहुल एक चांगला कर्णधार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली 30 वर्षांहून अधिक वयाचा आहे. उपकर्णधार रोहितचेही वय 30 पेक्षा अधिक आहे. क्रिकेटमध्ये येत्या काही दिवसांत एक नवीन पिढी पाहायला मिळेल. जर राहुलने चांगल्या प्रकारे तयारी केली तर तो एक चांगला कर्णधार असल्याचे सिद्ध होऊ शकेल. परंतु त्याला क्रिकेटच्या तीनही प्रकारात चांगले खेळावे लागेल. तो कसोटी क्रिकेटमध्ये खूप कमी खेळला आहे,” असे भाष्य गंभीरने राहुलच्या कर्णधारपदाबद्दल बोलताना केले.
गौतम गंभीरने पंजाब संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळेचेही कौतुक केले आहे. कुंबळेबद्दल बोलताना तो म्हणाला, “केएल राहुल आणि अनिल कुंबळे हे आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक- कर्णधाराची जोडी आहे. प्रशिक्षक म्हणून कुंबळेची कामगिरी पहिली तर त्याने मागच्या हंगामात मुंबईला आयपीएल करंडक जिकूंन देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. कुंबळे हा बहुधा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी प्रशिक्षक आहे. राहुल कुंबळेचे प्रशिक्षणाखाली नक्कीच चांगली कामगिरी करेल.”