आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सहावा सामना काल 24 सप्टेंबर रोजी किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर या दोन संघादरम्यान खेळला गेला. या सामन्यात पंजाब संघाने 97 धावांनी दणदणीत विजय मिळविला. या हंगामातील त्यांचा हा पहिलाच विजय होता.
या सामन्यात धडाकेबाज फलंदाज आणि पंजाबचा कर्णधार केएल राहुलची बॅट चांगलीच तळपली. त्याने अवघ्या 69 चेंडूत 132 धावा केल्या. त्याने पहिल्या 54 चेंडूत 77 धावा केल्या. त्यात त्याचा स्ट्राईक रेट 142 होता. पुढच्या 15 चेंडूत त्याने 55 धावा कूटल्या. शेवटी खेळलेल्या 15 चेंडूत त्याचा स्ट्राईक रेट 366 होता. त्याने शेवटच्या 9 चेंडूत तब्बल 42 धावा केल्या.
राहुल शतक झळकावण्यात यशस्वी ठरला त्यामागील सर्वात मोठे कारण विराटचे अत्यंत खराब क्षेत्ररक्षण हे होते. विराटने केएल राहुलचे दोन झेल सोडले. 83 धावांवर फलंदाजी करताना विराटने राहुलचा पहिला झेल सोडला. दुसरा झेल त्याने 89 धावांवर सोडला. यानंतर, नेहमीच उत्साही दिसणारा विराट खूप निराश आणि चिंताग्रस्त दिसत होता. जणू काही इतरांच्या चुकांवर ओरडणारा कर्णधार आपला चेहरा लपवत आहे, असे वाटत होते.
डेल स्टेन आणि शिवम दुबे यांना केले लक्ष
केएल राहुलने त्याला विराटकडून 2 वेळा जीवदान मिळाल्यानंतर अतिशय आक्रमकपणे फलंदाजी केली. डेल स्टेन आणि शिवम दुबे या गोलंदाजांना त्याने लक्ष केले. 19 व्या षटकात राहुलने 26 धावा केल्या. डेल स्टेनच्या या षटकात राहुलने 3 षटकार आणि 2 चौकार लगावले. 20 व्या षटकात, त्याला शेवटचे 3 चेंडू खेळण्याची संधी मिळाली आणि त्यात राहुलने 2 षटकारांसह 16 धावा फटकावल्या. त्याने 132 धावांच्या नाबाद खेळीत 14 चौकार आणि 7 षटकार लगावले.
काही विक्रम केले आपल्या नावावर
– आयपीएलमध्ये केएल राहुल हा सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने 2018 मध्ये रिषभ पंतने केलेल्या 128 धावांच्या खेळीला मागे टाकले आहे.
-केएल राहुल कर्णधार म्हणून आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी खेळणारा फलंदाज बनला आहे. त्याच्याआधी डेव्हिड वॉर्नरच्या नावावर हा विक्रम होता. त्याने 126 धावा 2017 च्या हंगामात कर्णधार म्हणून केल्या होत्या.