---Advertisement---

कोहलीच ठिक आहे, पण अन्य खेळाडूंची कसोटी क्रमवारी नक्की पहा!

On: गुरूवार, जानेवारी 9, 2020 3:15 PM
---Advertisement---

नुकतीच ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 3-0 अशा फरकाने विजय मिळवत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे. तसेच दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा कसोटी सामनाही पार पडला. या सामन्यात इंग्लडने 189 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यांनंतर बुधवारी आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल क्रमांकावर कायम आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकाचा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ कायम आहे.

या दोघांपाठोपाठ आता तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅब्यूशाने विराजमान झाला आहे. तो मागील अनेक महिन्यांपासून दमदार खेळ करत आहे. त्याने न्यूझीलंड विरुद्धही 549 धावा केल्या आहेत. त्याचमुळे त्याने कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेत केन विलियम्सनला मागे टाकून तिसरा क्रमांक पटकावला आहे.

विलियम्सनची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत खास खेळ करता आला नव्हता. त्याने या मालिकेत खेळलेल्या दोन सामन्यात मिळून 57 धावा केल्या.

त्याचबरोबर या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्याच डेव्हिड वॉर्नरनेही प्रगती केली असून त्याने चेतेश्वर पुजारा आणि बाबार आझर यांना मागे टाकत पाचवा क्रमांक मिळवला आहे. तर इंग्लंडचा कर्णधार जो रुटने 1 स्थानांनी पुढे येत 8 वा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे 9 व्या क्रमांकावर घसरला आहे.

याबरोबरच दक्षिण आफ्रिकाविरुद्ध शानदार अष्टपैलू खेळ करणारा बेन स्टोक्सने फलंदाजांच्या क्रमवारीत 10 वा क्रमांक मिळवला आहे. त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध 47 आणि 72 धावांची खेळी केली होती. तसेच तो गोलंदाजांच्या यादीत 27 व्या क्रमांकावर आला आहे.

गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स अव्वल क्रमांकावर कायम आहे. तर न्यूझीलंडचा निल वॅगनर आणि वेस्ट इंडिजचा कसोटी कर्णधार जेसन होल्डर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कायम आहेत.

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने 2 स्थानांची प्रगती करत 5 वे स्थान मिळवले आहे. तसेच इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात घेतलेल्या 5 विकेट्समुळे पुन्हा पहिल्या 10 गोलंदाजामध्ये स्थान मिळवले आहे. तो आता 7 व्या क्रमांकावर आला आहे.

या यादीत भारताचा जसप्रीत बुमराह 6 व्या, आर अश्विन 9 व्या आणि मोहम्मद शमी 10 व्या क्रमांकावर कायम आहेत.

अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जेसन होल्डर, रविंद्र जडेजा, बेन स्टोक्स, वर्नोन फिलँडर आणि आर अश्विन हे अनुक्रमे पहिल्या 5 क्रमांकांवर कायम आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---