बॅडमिंटन खेळाच्या भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जागतिक बॅडमिंंटन खेळात प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या लक्ष्य सेनने पदक पक्के केले आहे. पुरुषांच्या गटात लक्ष्य सेन उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला आहे. उपांत्यपूर्व सामन्यात लक्ष्यला वॉकओवर मिळाला होता. मागच्या आठवड्यात लक्ष्य जर्मन ओपनमध्ये उपविजेता ठरला होता.
२० वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्यने जानेवारी महिन्यात पहिल्यांदा सुपर ५०० इंडिया ओपनमध्ये विजेतेपद पटकावले होते. ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये मलेशियाचा सहावा नामांकित ली झी जिला आणि जपानचा द्वितीय नामांकित केंतो मोमोत यांच्यात उपांत्यपूर्व सामना होणार आहे. या दोघांपैकी जो खेळाडू विजयी ठरेल, त्याच्याशी लक्ष्य सेन (Lakshya Sen) उपांत्य सामन्यात भिडणार आहे.
मागच्या वर्षी सर्वात कमी वयात जागतिक चॅम्पियनशिपचे मेडल मिळवण्याची कमाल भारतीय पुरुष गटातील लक्ष्य सेनने केली होती. त्याचे कोर्टमधील प्रदर्शन जबरदस्त होते. गुरुवारी (१७ मार्च) लक्ष्य सेनने जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू एडर्स एंटोनसेन याला २१-१६, २१-१८ अशा फरकाने पराभवाची धूळ चारली. तसेच मागच्या आठवड्यात लक्ष्यने जर्मन ओपनमध्ये अंतिम सामन्यात स्थान पक्के केले होते आणि उपविजेता बनला होता.
दुसरीकडे गायत्री गोपीचंद आणि त्रिसा जॉली या भारतीय जोडीने ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२२ मध्ये महिलांच्या गटातील उपांत्यपूर्व सामन्यात कमाल प्रदर्शन केले. या दोघांनी ली सोही आणि शिन सेउंगचन या दक्षिण कोरियाई जोडीला १४-२१, २२-२०, २१-१५ अशा फरकाने पराभूत केले. गायत्री आणि त्रिसा ही भारतीय जोडी ४६ व्या रँकवर आहेत. तर दुसरीकडे सोही आणि शिन ही जोडी जगातील दुसऱ्या क्रमांकावर आहे. पी गायत्री गोपीचंद भारताचे महान बॅडमिंटन खेळाडू आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची मुलगी आहे.
महिलांच्या गटाचा विचार केला, तर भारताची पीव्ही सिंधूने जपानच्या सयाका ताकाहाशीकडून १९-२१, २१-१६ आणि १७-२१ अशा फरकाने पराभव पत्करला होता. त्याआधी सायनाही तीन सेटपर्यंत रोमांचक ठरलेल्या सामन्यात द्वितीय मानांकित खेळाडू अकाने यामागुचीकडून पराभूत झाली होती.
महत्वाच्या बातम्या –
एसएनबीपी २८वी नेहरु अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी: २८ वर्षांत प्रथमच पुणे विद्यापीठ अंतिम फेरीत
…अन् ‘त्याने’ सबंध क्रिकेटविश्वाला दाखवून दिले की आपण मुरलीधरनपेक्षा कमी नव्हतो
ऑस्ट्रेलियन दिग्गजाला बघायचाय ‘हिटमॅन’चा राग; म्हणाला, ‘रोहितला कठीण जाणारंय…’