रामायणातील लंका दहनाची गोष्ट तर सर्वांना माहित असेलच. पण आज आपण वर्तमानातील श्रीलंकेच्या अधोगमनाची चर्चा करू.
लहानपणी रावण, कुंभकर्ण, मेघनाद यांच्यापेक्षा जास्त भीती वाटायची तर ती रणतुंगा, जयसूर्या, अटापटटू आणि मुरलीथरन यांची. भारताविरुद्ध यांची कामगिरी नेहमीच चमकदार असायची.
१९९६च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारताच्या जिव्हारी लागलेला पराभव, कसोटीतील सर्वोच्च धावांचा विक्रमी डोंगर (९५२/७), आशिया कप मध्ये भारताचे पराभव (१९९७,२००४,२००८ आणि २०१०) आणि २००७ च्या विश्वचषकातून भारताला बाहेर करणारा श्रीलंकेचा विजय. हे काही अगदी बोचरे असे श्रीलंकेचे भारताविरुद्ध विजय आहेत.
सौरव गांगुली कर्णधार झाल्यापासून मात्र हे चित्र बदलत गेले. भारत-श्रीलंका सामने अटीतटीचे होऊ लागले. २००४ ते २००९ पर्यंतच्या ४२ सामन्यांमध्ये भारत २३ तर श्रीलंका १५ सामन्यात विजयी झाला.
२०११ पासूनच्या २७ सामन्यात मात्र भारताविरुद्ध श्रीलंका केवळ ५ सामने जिंकू शकला आहे. मागच्या आठवड्यातील ०-५ असा घरच्याच खेळपट्टीवर झालेला दारुण पराभव सुद्धा यात समाविष्ट आहे.
गेल्या एक वर्षातील श्रीलंकेची कामगिरी हे त्यांच्या अधोगतीचे द्योतक आहे. त्यातील काही महत्वाचे परिणाम खालीलप्रमाणे
• दक्षिण आफ्रिकेत झालेला ०-३ (कसोटी), ०-५ (एक दिवसीय) पराभव
• बांगलादेशने श्रीलंकेत केलेला कसोटी पराभव
• झिम्बाब्वेने श्रीलंकेत एकदिवसीय मालिकेत केलेला पराभव
• भारताने श्रीलंकेत उडवलेला ०-३ (कसोटी), ०-५ (एक दिवसीय) आणि ०-१ (T२०) असा धुव्वा.
अनेक वर्ष श्रीलंकेला श्रीलंकेत हरवणं हे फार कठीण मानल जात होते. महेला-संगा, दिलशान सारखे आकर्षक फलंदाज आणि मुरली-वास-हेरथ-मेंडिस सारखे जादुई गोलंदाज असलेल्या संघाला त्यांना पोषक असणाऱ्या परिस्थितीत हरवणे अर्थात महाकठीण होते.
कालांतराने खेळाडू बदलत गेले आणि श्रीलंकन क्रिकेट दुबळं होत गेलं. कुठल्याही संघाचे एवढे वाईट दिवस एका कारणाने येत नाहीत. अनेक चुकांचा एकत्र परिणाम होऊन कामगिरी खालावते. श्रीलंकन क्रिकेट संबंधी नेमकं काय झाला याचा आढावा घ्यायचा प्रयत्न करूया.
दुखापती
दुष्काळात तेरावा महिना ही म्हण जर सिंहलीत भाषांतरित केली तर कदाचित प्रत्येक श्रीलंकन माणसाला मनापासून पटेल.मानसिक दुखापती कमी नव्हत्या, त्या भरीस श्रीलंकेला शारीरिक दुखापतींचा सामना करावा लागला. गेल्या काही महिन्यात सतत होणाऱ्या दुखापती ह्या निवड समितीसाठी मोठी डोकेदुखी आहे.
भारताविरुद्धच्या मालिकेचं उदाहरण घेतला तरीही याचा प्रभाव सहज कळून येईल.–
प्रमुख फलंदाज दिनेश चंडिमल न्यूमोनियामुळे मालिकेच्या पहिल्या कसोटीस मुकला
-श्रीलंकेचा ऐन भरात असलेला असेला गुणरत्ने पहिल्या कसोटीच्या पहिल्याच सत्रात तो जायबंदी झाला.
-श्रीलंकेचा एकहाती खांब रंगना हेरथ सुद्धा दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत फलंदाजी करू शकला नाही, तिसऱ्या कसोटीला ही तो मुकला.
-पहिल्या कसोटीनंतर सुरंगा लकमल पाठीच्या दुखण्यामुळे बाहेर
-दुसऱ्या कसोटीत संघातील एकमेव द्रुतगती गोलंदाज नुवान प्रदीप जायबंदी.
हे केवळ एका मालिकेपुरते आहे. गोष्टी बिघडत गेल्या कि किती बिघडू शकतात हे यावरून कळून येते.
खेळाडूंची निवृत्ती
प्रत्येक संघाला या अवस्थेतून जावं लागते. दिग्गज खेळाडू जसे निवृत्त होतात तसे संघाची जडणघडण बदलते. नवोदित चेहऱ्याना संधी द्यावी लागते. साहजिकच अशा वेळी काही पराभव स्वीकारावे लागतात. मात्र पुढील वाटचालीसाठी ती एक तत्कालीन तडजोड असते.
पण संघाची मागची फळी (बेंच स्ट्रेंग्थ) यासाठी मजबूत हवी. जयवर्धने, संगकारा, दिलशान ह्यांच्या निवृत्तीनंतर श्रीलंकेची अवस्था हवालदिल झाली. आलेले फलंदाज सातत्य दाखवू शकले नाही. आपली जागा ते संघात कायम करू शकले नाहीत. रंगना हेरथ आणि लसिथ मलिंगा नंतर कोण याचे ही उत्तर सध्या त्यांच्याकडे नाही.
कर्णधार प्रशिक्षक यांची संगीत खुर्ची
ट्रेवर बेलीस, स्टुअर्ट लॉ, रमेश रत्नानायके, जेफ मार्श, ग्रॅहम फोर्ड, पॉल फारब्रेस, मर्वान अटापटटू, जेरॉम जयरत्ने, पुन्हा ग्रॅहम फोर्ड आणि आता निक पोथास. गेल्या ४ वर्षातील हे श्रीलंकन संघाचे प्रशिक्षक. TV वरील channel बदलावा तसे प्रशिक्षक बदलेले गेले. ग्रॅहम फोर्डने श्रीलंकेने संयम बाळगावा, प्रगतीसाठी वेळ द्यावा लागेल असे आवाहन केले होते. मात्र बांगलादेश विरुद्धचा पराभव तिखट लागल्यामुले फोर्डची पुन्हा हकालपट्टी झाली. सध्याच्या पोथासना किती वेळ मिळतो हे श्रीलंकन क्रिकेट बोर्डच जाणे.
अँजेलो मॅथ्यूस सर्वोत्तम कर्णधार नसला तरी श्रीलंकेकडे त्यापेक्षा चांगला पर्याय नव्हता. जबाबदार आणि खेळाशी प्रामाणिक, बुडत्या जहाजाचा कॅप्टन शोभेल असंच त्याचे व्यक्तिमत्त्व. मात्र बोर्डाने त्याला आधीच जलसमाधी दिली. संघात जागा पक्की नसलेल्या थरंगाला कर्णधार करण्यात आला. कसोटीसाठी चंडिमलला कर्णधारपद दिले गेलं.
भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तर ५ सामन्यात श्रीलंकेचे ३ कर्णधार होते. चाणाक्ष वाचकांना यावरून सद्यपरिस्थितीचा अंदाज आला असेलच.
लहरी निवडसमिती
एकाद्या ठिकाणी हरवल्यावर कसं आपण GPS वापरून आपला मार्ग शोधतो. श्रीलंकन बोर्डाचे निवड समितीरूपी GPSने मात्र त्यांची गाडी रस्त्यावर आणायच्या ऐवजी ती अजून घनदाट जंगलात आणून सोडली. गेल्या आठवड्यात संपूर्ण निवड समितीने राजीनामा देऊन अंशतः या हाराकीरीची जबाबदारी उचलली आहे.
अर्थात खेळत नसले तरी निवडसमितीचे निर्णय हे खेळावर प्रचंड प्रभाव टाकतात. युवा खेळाडूंना पारखून त्यांना योग्य वेळी योग्य संधी देणे, प्रोत्साहन देणे हे महत्वाचे काम आहे. चांगल्या खेळाडूवर विश्वास टाकून, ते अपयशी होत असताना सुद्धा त्यांना संधी देणे महत्वाचे असते. अशावेळी धरसोड वृत्ती घातक ठरते. नेमके हेच श्रीलंकेने केलं. गेल्या २ वर्षात श्रीलंकेकडून ४१ खेळाडू एकदिवसीय क्रिकेट खेळलेत. इतके जास्त खेळाडू दुसर्या कुठच्याही देशाने खेळवले नाहीत. अर्थात दुखापतींमुळे सुद्धा नवनवीन खेळाडू आले पण निवड समितीसुद्धा यासाठी जबाबदार आहे.
या पदावर दुर्बिणीसारखी दूरदृष्टी असणे सर्वात महत्त्वाचे असते. मात्र श्रीलंकन निवडसमितीने ती दुर्बीण नेमकी उलटी पकडली. नवी येणारी निवडसमिती याची पुनरावृत्ती करते कि नाही ह्यावर श्रीलंकन क्रिकेटचे भवितव्य ठरेल. श्रीलंका यानंतर पाकिस्तानविरुद्ध यु.ए.ई. मध्ये खेळतील. वर्षअखेरीस भारतात भारताचे आव्हान त्यांना झेलायचे आहे. त्यांचे शालेय क्रिकेट अजूनही चांगले खेळाडू पुढे आणत आहे. समयोचित निर्णय आणि त्या निर्णयांमधील सातत्य टिकवता आले तर श्रीलंकन क्रिकेटला पुढे नक्कीच चांगले दिवस येतील.
– ओंकार मानकामे (@Oam_16 on twitter)
(लेखक मुक्त पत्रकार असून क्रिकेट खेळाचे विश्लेषक आहेत.)
# सर्व सांख्यिक माहिती www.espncricinfo.com च्या Statsguru वरून घेतली आहे.
# Andrew fidel fernando हे espncricinfoचे श्रीलंकन पत्रकार आहेत. श्रीलंकन क्रिकेट वर वेळोवेळी बरेच माहितीपूर्ण लेख त्यांनी लिहिले आहेत. या लेखासाठी त्यातील काहींचा आधार घेतला आहे.