-महेश वाघमारे
क्रिकेटचे मूळ रूप म्हणजेच कसोटी क्रिकेट. कोणत्याही वेळेचे दिवसांचे बंधन नसताना खेळले जाणारे कसोटी क्रिकेट ते आजकालचे झटपट टी१० क्रिकेट अशी उत्क्रांती क्रिकेट खेळाने केली. अमर्याद काळ चालणारा सामना ते दोन तासात संपणारा सामना ही क्रिकेटच्या प्रसिद्धीची पावती आहे.
१९७० नंतर साठ षटकांचे एकदिवसीय क्रिकेट सुरू झाले. त्याच्यात बदल होऊन नंतर ते ५० षटकांपर्यंत मर्यादित केले. २००५ मध्ये टी२० चे रोपटे लागले आणि त्याचा वटवृक्ष वाढला. खेळाडूंनी आपल्या तंत्रात बदल करत या क्रिकेटला पूरक असे वेगळेच तंत्र बनवले. पुढील दहा वर्षात टी२० आणि नव्याने येऊ घातलेल्या १०० ही नवीन प्रारूपे आपण पाहणार आहोत.
या सर्वांमध्ये क्रिकेटचे मूळ स्वरूप म्हणजे कसोटी क्रिकेट अजूनही तग धरून उभे आहे. चेतेश्वर पुजारा, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशंगे, डीन एल्गर, अझर अली यांसारखे खेळाडू या क्रिकेटच्या मूळ रूपाला अनुसरून खेळ करताना दिसतात.
कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम रचले गेले. १५० वर्षांहून अधिक असलेल्या या खेळाची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. सर जॅक हॉब्स यांना क्रिकेटचे पितामह म्हटले गेले, तर ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन यांना क्रिकेटचा बादशहा, भारताच्या सचिन तेंडुलकरने धावांचा एवरेस्ट उभारला, परंतु या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मात्र नोंदविला गेला वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याच्या नावे.
२००४ मध्ये इंग्लंडचा संघ वेस्टइंडीजच्या दौऱ्यावर गेला होता. चार कसोटी आणि सात वनडे सामन्यांचा हा दौरा होता. इंग्लंडचे नेतृत्व मायकल वॉन तर यजमानांचे नेतृत्व ब्रायन लारा करत होता. कसोटी मालिकेला विस्डेन ट्रॉफी असे नाव दिले गेले होते.
इंग्लंडने दौऱ्याची सुरुवात विजयाने करत जमैकामधील पहिली कसोटी आरामात जिंकली. पोर्ट ऑफ स्पेन व ब्रिजटाऊन येथील पुढील दोन कसोटी जिंकत इंग्लंडने विस्डेन ट्रॉफी आपल्याकडे राखली. इंग्लंडने ३-० ने अजेय आघाडी मिळवली होती.
चौथी शेवटची आणि औपचारिक कसोटी अॅटीगामधील सेंट जॉन्स येथील अॅटीगा रिक्रिएशन मैदानावर होती. वेस्ट इंडीजसाठी हा सामना प्रतिष्ठेचा होता. वॉन व लारा नाणेफेकीसाठी मैदानात उतरले. लाराने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला.
वेस्ट इंडिजची सलामी जोडी ख्रिस गेल व डॅरेन गंगा मैदानात उतरले. गेलने आपल्या नेहमीच्याच पद्धतीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. १४ व्या षटकात संघाच्या ३३ धावा झाल्या असताना गंगा बाद झाला. त्याच्या जागी कर्णधार ब्रायन लाराने मैदानात पाऊल ठेवले. खुद्द लाराला ही वाटले नसेल यानंतर काय इतिहास घडणार आहे.
गेलसोबत लाराने वेस्ट इंडिजचा डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. गेल आपली बॅट चांगली फिरवत होता.
पहिल्या सत्राच्या शेवटी गेल वैयक्तिक ६९ धावाकाढून बाद झाला. गेल बाद झाल्यानंतर लारासोबत अनुभवी रामनरेश सरवान याने जोडी जमवली. दोघांनी इंग्लंडला अजिबात यश न मिळू देता डाव सावरला. पूर्ण दिवस दोघांनी इंग्लंडला क्षेत्ररक्षण करून चांगलेच दमवले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडीजच्या धावफलकावर २०८ धावा लागल्या होत्या.
दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला. काही षटके गेल्यानंतर रामनरेश सरवान वैयक्तिक ९० धावा झाल्या असताना हार्मिसनच्या गोलंदाजीवर मार्क ट्रेस्कॉथिकच्या हाती झेल देऊन परतला. त्याच्याजागी आलेला रिकार्डो पॉवेल काही काळ साथ देऊन पुन्हा तंबूत परतला. दरम्यान लाराने आपले २५ वे शतक पूर्ण केले.
लाराने डावाची सूत्रे आपल्या हाती घेत वेगाने धावा काढायला सुरुवात केली. रियान हींडने ३६ धावा काढून त्याला साथ दिली. दोघांनी मिळून ९० धावांची भागीदारी रचली. त्याच वेळी लाराने आपले द्विशतक साजरे केले होते. संघाच्या ४६९ धावा झाल्या असता हींड बाद झाला. सर्वजण लाराच्या त्रिशतकाची व वेस्टइंडीजच्या डावाच्या घोषणेची वाट पाहत होते.
लारा आणि यष्टीरक्षक जेकब यांनी डाव पुढे सुरू ठेवला. अखेरच्या सत्रात लाराने आपले दुसरे त्रिशतक साजरे केले. सर्वांना वाटले आता डाव घोषित होऊ शकतो परंतु लाराने खेळ चालू ठेवला. लारा व जेकब यांनी आणखी पडझड न होऊ देता दुसऱ्या दिवशीचा खेळ यशस्वीरित्या संपविला. वेस्टइंडीजची दुसऱ्या दिवसाअखेर धावसंख्या होती ५ बाद ५९५.
तिसऱ्या दिवशी खेळ सुरू झाल्यावर जेकब व लाराने धावांचा वेग वाढवला. लाराच्या ३५० धावा झाल्यावर सर्वांना मॅथ्यू हेडनच्या ३८१ धावांच्या विक्रमाची आठवण झाली. तो विक्रम मोडून तो ४०० धावाही करू शकतो असा विश्वास वाटू लागला. यादरम्यान जेकबने आपले शतक पूर्ण केले. मैदानावरील तसेच टीव्हीवर सामना पाहणारे सर्व प्रेक्षक लाराच्या ४०० धावांची वाट पाहत होते.
गॅरेथ बॅटीच्या चेंडूवर स्विप मारत लाराने आपली विश्वविक्रमी धाव घेतली. सर्व मैदानावर टाळ्यांचा गडगडाट होत होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या या महान फलंदाजाच्या नावे नोंदवली गेली होती. वेस्टइंडीजने आपला डाव ७५१-५ धावांवर घोषित केला.
धावांचा पाठलाग करताना इंग्लंड २८५ धावांवर सर्वबाद झाले. वेस्टइंडीजने त्यांना फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात इंग्लंडने कर्णधार वॉनच्या शतकाच्या बळावर ४२२ धावा जमविल्या. सामना अनिर्णित राहिला.
पहिल्या तीन सामन्यात मिळून १०० धावा बनवणाऱ्या लाराने एका डावात ४०० धावा बनवून विश्वविक्रम प्रस्थापित केला. आपल्या संघाला व्हाईट वॉशच्या नामुष्की पासून वाचवले. लाराने आपल्या ४०० धावांच्या खेळीत ४३ चौकार व ४ षटकार मारत, मॅथ्यू होगार्ड, अॅण्ड्रू फ्लिंटॉफ, स्टीवन हार्मिसन यासारख्या दिग्गजांच्या ५८२ चेंडूंचा सामना करताना विक्रमी १२ तास ५८ मिनिटे फलंदाजी करत कसोटी क्रिकेटचा दर्जा दाखवून दिला.
आयसीसीने ” असामान्य खेळाडूकडून झालेली ही असामान्य खेळी ” असे या खेळाचे वर्णन केले होते.
वाचा- स्पेशल टेस्ट इनिंग्स भाग १- दिग्गजांच्या मांदियाळीत गंभीरची ती अजरामर मॅरेथॉन खेळी