टी२० विश्वचषक २०२१ मध्ये, इंग्लंडने सुपर १२ टप्प्यात बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने इंग्लंडसमोर १२५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. जेसन रॉयच्या ६१ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडने हे लक्ष्य १४.१ षटकांत पूर्ण केले. इंग्लंडचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला आहे. या विजयासह इंग्लड संघाने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
इंग्लंडच्या नावे नवा विक्रम
इंग्लड संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश संघाला ८ गड्यांनी नमवून सर्वाधिक गडी राखून विजय मिळवण्याचा विक्रम नोंदवला. याआधी इंग्लड संघाने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघाला २०१० च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत सात गडी राखून पराभूत केले होते. तसेच २०१६ च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लड संघाने दिल्ली येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव केलेला. मात्र, बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात इंग्लड संघाने आठ गडी राखून विजय मिळवल्याने आपला नवा विक्रम टी२० विश्वचषक स्पर्धेत नोंदवला आहे.
सामन्यात इंग्लंडची सरशी
तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १२४ धावा केल्या. संघाकडून मुशफिकुर रहीमने सर्वाधिक २९ धावा केल्या. कर्णधार महमुदुल्लाह आणि नसुम अहमद यांनी प्रत्येकी १९-१९ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून टायमल मिल्सने तीन, मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी दोन तर ख्रिस वोक्सने एक विकेट घेतली. जेसन रॉयच्या ६१ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडने हे लक्ष्य १४.१ षटकांत पूर्ण केले. डेविड मलान २८ धावांवर नाबाद राहिला. या स्पर्धेतील इंग्लंडचा हा सलग दुसरा विजय आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिजचा ६ गडी राखून पराभव केला होता. त्याचबरोबर बांगलादेशचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी त्यांना श्रीलंकेने पाच गडी राखून पराभूत केले होते.