वनडे विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना, आपण विश्वचषक इतिहासात घडलेल्या अशा काही घटनांचा मागोवा घेत आहोत, क्रिकेटप्रेमींच्या मनातून कधीही पुसणार नाही अशा आहेत. या मालिकेतील एक घटना आहे 2007 वनडे विश्वचषकाच्या दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका सामन्यातील. अत्यंत अटीतटीचा झालेला हा सामना दक्षिण आफ्रिकेने एक गडी राखून जिंकला अशी याची स्कोर बुकमध्ये नोंद असली तरी, त्या दिवसाचा आणि पर्यायाने त्यानंतर श्रीलंका क्रिकेटचा हिरो होता लसिथ मलिंगा.
साखळी फेरीत आपला गट टॉप करून श्रीलंका आणि दुसरीकडे मजबूत म्हणली जाणारी दक्षिण आफ्रिका सुपर 8 मध्ये पोहोचली होती. सुपर 8 ची सुरुवात विजयाने करण्यासाठी दोन्ही संघ गयानाच्या प्रोव्हिअन्स स्टेडियमवर उतरले. पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेचा डाव तुलनेने तितक्या भेदक नसलेल्या चार्ल्स लॅंग्वेल्टच्या अचूक टप्प्यावरील गोलंदाजी पुढे अक्षरशः गडगडला. त्याने अवघे 39 रन्स देऊन श्रीलंकेचा निम्मा संघ गारद केला. एकटा रसेल अर्नोल्ड 50 मारू शकला. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी आव्हान होते फक्त 210 धावांचे.
तगड्या बॅटिंग लाईनसाठी हे आव्हान अगदी छोटेसे होते. कॅप्टन ग्रॅमी स्मिथ 59 आणि जॅक कॅलिस 80 पेक्षा जास्त धावा करून संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेले. सामना दक्षिण आफ्रिकाकडे इतका गेला होता त्यांना 6 ओव्हरमध्ये फक्त 10 धावांची गरज होती. त्यानंतर 45 वी ओव्हर टाकण्यासाठी आला लसिथ मलिंगा. तो दिवस मलिंगासाठी अत्यंत निराशाजनक होता. कारण त्याच्या 7 ओव्हरमध्ये तोपर्यंत 43 धावा कुटल्या गेलेल्या. आणि विकेटचा कॉलमही खालीच होता.
ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर शॉन पॉलॉकने फोर मारत त्याचे आकडे आणखीनच बिघडवले. चौथ्या चेंडूवर पुन्हा त्याने दोन धावा घेतल्या. त्यांना आता विजयासाठी हवे होते फक्त चार रन्स, हातात होत्या पाच विकेट आणि चेंडू शिल्लक 32. मात्र, पाचव्या चेंडूवर मलिंगाने स्लोअर वन टाकत पोलॉकचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आलेल्या ऍण्डू हॉल याला देखील त्याने थरंगाच्या हातात झेल द्यायला भाग पाडले.
पुढची ओव्हर टाकायला आला फॉर्ममध्ये असलेला चमिंडा वास. कॅलिसने पहिल्याच चेंडूवर एक धाव घेत विजय आणखी जवळ आणला. मात्र, त्यानंतर वासने पाचही चेंडूवर रॉबीन पीटरसनला हलू दिले नाही. 47 वी ओव्हर घेऊन पुन्हा मलिंगा आला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे अजूनही चान्सेस जास्तच होते. कारण 86 धावा करून कॅलिस तिथे उभा होता.
मलिंगाने त्यानंतर जे घडवलं ते क्रिकेट इतिहासात त्यासाठी आधी कधी घडलं नव्हत. मलिंगाने कॅलिसला कीपर संगकाराच्या हाती झेल द्यायला लावत आपली हॅट्रिक पूर्ण केली. वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करणारा तो केवळ पाचवा गोलंदाज होता. त्यानंतर दहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आला मखाया एन्टिनी. आता दक्षिण आफ्रिकेपासून विजय तीन धावा तर श्रीलंकेपासून दोन विकेट दूर होता. मलिंगाने असा काही परफेक्ट यॉर्कर मारला की, एन्टिनीकडे त्याचे उत्तर नव्हते. क्लीन बोल्ड करत मलिंगाने क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच चार चेंडूवर चार विकेट घेण्याचा पराक्रम केला. संपूर्ण जग अक्षरशः स्तब्ध झाले होते.
हे सगळे होत असताना दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आणि प्रेक्षकांच्या मात्र अंगावर काटा आलेला. कुठे 5 गडी शिल्लक असताना चार धावांची आवश्यकता असलेल्या दक्षिण आफ्रिकेला आता एक गडी शिल्लक असताना आणखी तीन धावा करायच्या होत्या. गोलंदाजीत स्टार ठरलेल्या लँग्वेल्टने कसेतरी दोन चेंडू निभावून नेले. पाचव्या चेंडूवर जयसूर्याकडून मिस फिल्ड झाली आणि दक्षिण आफ्रिकेला एक रन मिळाला. शेवटचा चेंडू पीटरसनला पुन्हा एकदा डॉट.
48 व्या षटकात वासने पुन्हा आपला क्लास दाखवत पूर्ण ओव्हर मेडन टाकली. मैदानात आणि टेलिव्हिजनवर सामना पाहत असलेल्या सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढत होते. पुढच्या ओव्हरचा पहिला चेंडू मलिंगाने डॉट केला आणि सर्वजण आपल्या जागेवर उभे राहिले. मलिंगाचा फॉर्म पाहता श्रीलंकेला संधी होती. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच होते. पुढच्या चेंडूवर पीटरसनच्या बॅटची कड घेऊन चेंडू थेट सीमारेषेपार गेला. दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला. मात्र, मन जिंकले मलिंगा आणि वासच्या भेदक गोलंदाजीने.
रटाळ आयोजनासाठी ओळखल्या गेलेल्या त्या 2007 वनडे विश्वचषकाचे नाव काढले जाते तेव्हा मलिंगा आणि त्याचे हे चार बळी नेहमीच हायलाईट म्हणून समोर येतात.
(Lasith Malinga 4 Ball 4 Wickets In 2007 ODI World Cup)
विश्वचषक विशेष-
विश्वचषक कमी, पण शतके जास्त! रोहितचा World Cupमधील भन्नाट Record, 2023मध्ये भीमपराक्रम करण्याची संधी
वर्ल्डकप 2019 मध्ये घडलेले सर्व विक्रम, रोहित-वॉर्नरकडे यावर्षी मोठी संधी
किस्से वर्ल्डकपचे: वर्ल्डकप म्हटलं की 2003 ची फायनल आणि पॉंटिंग डोक्यातून जात नाही
किस्से वर्ल्डकपचे: त्यादिवशी चिन्नास्वामीवर केविन ओब्रायनने इंग्लडला गुडघ्यावर आणलेलं