१२ मे २०१९, हैदराबादचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, आयपीएलच्या १२ व्या पर्वाचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये होत होता. मुंबईने दिलेले १५० धावांचे लक्ष पूर्ण करण्यासाठी व आयपीएलचे सलग दुसरे विजेतेपद मिळविण्यासाठी चेन्नईला एका चेंडूत दोन धावांची गरज होती. फलंदाजी करत होता चेन्नईचा शार्दुल ठाकुर. तर गोलंदाजीला होता मुंबईचा सर्वात अनुभवी खेळाडू वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा. ३० यार्डावरून धावत येत मलिंगाने चेंडू टाकला. नेहमीसारखा यॉर्कर नव्हता पण शार्दुलच्या पॅडवर चेंडू जाऊन आदळला. मुंबईच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले आणि पंच नितीन मेनन यांनी आपले बोटवर उचलले. मुंबई इंडियन्स चौथ्यांदा आयपीएल विजेता झाला होता. सर्व स्पर्धत मुंबई अफलातून खेळणी मात्र अखेरच्या षटकात शेन वॉटसन, रवींद्र जडेजा व शार्दुल ठाकुर यासारख्या फटकेबाजांना ९ धावा मलिंगाने करू दिल्या नाहीत. त्या ९ धावा वाचवून वय झाले तरी सिंह शिकार करायची सोडत नाही हे मलिंगाने दाखवून दिले. आज त्याच मलिंगाचा ३९ वा वाढदिवस.
विचित्र ॲक्शनने गोलंदाजी करणाऱ्या मलिंगाने २००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण, मलिंगाला खरी ओळख मिळाली ती वेस्टइंडीज येथे झालेल्या २००७ क्रिकेट विश्वचषकादरम्यान. ८ मार्च २००७ रोजी श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषकातील सुपर एट फेरीचा सामना खेळला जात होता.द. आफ्रिकेला विजयासाठी पाच धावांची आवश्यकता होती आणि त्यांचे पाच गडी शिल्लक होते. एका शतकात द. आफ्रिका सामना जिंकेल अशी परिस्थिती होती पण त्याचवेळी मलिंगाने चमत्कार केला. द. आफ्रिकेच्या डावातील ४५ वे षटक टाकण्यासाठी मलिंगाकडे चेंडू सोपविण्यात आला. त्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने शॉन पोलॉकचा त्रिफळा उडवला आणि पुढच्या चेंडूवर अँड्रु हॉलला झेलबाद केले. ४७ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर जॅक कॅलिसला यष्टीरक्षक संगकाराच्या हाती झेल घ्यायला भाग पाडत आपली हॅट्रिक पूर्ण केली. विश्वचषकाच्या इतिहासातील ही केवळ पाचवी हॅट्रिक होती. पुढील चेंडूवर मखाया एन्टिनीच्या यष्ट्या वाकवत त्याने चार चेंडू चार बळी घेण्याची किमया साधली. अंतिम बळीही त्याने जवळ जवळ घेतला होता मात्र चेंडू यष्ट्यांना चाटून गेला. मलिंगाच्या ऐतिहासिक कामगिरी नंतरही द. आफ्रिकेने एक गडी राखून तो सामना जिंकला.
२०११ विश्वचषकात केनियाविरुद्ध हॅट्रिक घेत दोन वेगवेगळ्या विश्वचषकात हॅट्रीक घेणारा तो पहिला गोलंदाज बनला. त्याच वर्षी, ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अजून एक हॅट्रिक घेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन हॅट्रिकचा विक्रम त्याने आपल्या नावे केला. दुखापती टाळण्यासाठी व मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आपली कारकीर्द लांबवण्यासाठी त्याने २०११ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय वनडे व टी२० शिवाय व्यवसायिक टी२० लीगकडे जास्त लक्ष केंद्रित केले. २०१४ मध्ये बांगलादेश येथे झालेल्या टी२० विश्वचषकात श्रीलंकेने विजेतेपद मिळवले होते. नियमित कर्णधार दिनेश चंडीमल याला स्पर्धेच्या मध्यात निलंबित करण्यात आल्याने कर्णधारपदाची जबाबदारी मलिंगावर सोपवण्यात आली होती. त्याने ती भूमिका यशस्वीरित्या पार पाडत श्रीलंकेला विश्वविजेते केले. मलिंगाच्या नावे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये देखील दोन हॅट्रिक आहेत. वनडेप्रमाणे, टी२० मध्ये देखील त्याने चार चेंडूवर चार बळी टिपण्याची कामगिरी करून दाखवली आहे. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १०० बळी मिळवणारा तो एकमेव गोलंदाज ठरतो.
मलिंगा २००८ पासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आहे. मुंबईला चार आयपीएल विजेतेपद मिळवून देताना त्याने मुंबईच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले. आजही तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मलिंगाने आत्तापर्यंत १७० आयपीएल बळी मिळवून आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून आपली छाप पाडली आहे. आयपीएल व्यतिरिक्त तो इतरही देशांतील टी२० लीग खेळतो.
आपल्या धारदार यॉर्करने भल्याभल्यांची भंबेरी उडवणारा मलिंगा आता कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आला आहे. कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमधून आधीच निवृत्त झालेला मलिंगा कदाचित अखेरच्या वेळी आयपीएल खेळताना दिसू शकतो. श्रीलंका क्रिकेट एका वाईट काळातून जात असताना मलिंगा सारख्या अनुभवी खेळाडूने कर्णधार व सल्लागार अशा दुहेरी भूमिका निभावत ते पूर्ववत करण्याचा कायम प्रयत्न केला आहे.
ट्रेंडिंग लेख –
टेलरच्या दुकानात कामाला, पुढे रिक्षाचालक ते जगातील स्टार फलंदाज असा प्रवास करणारा तो