आजपासून(23 मार्च) आयपीएलच्या 12 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. पण हा मोसम सुरु होण्याआधीच मुंबई संघाला एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अनुभवी दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा हा मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सहा सामन्यांमध्ये खेळणार नाही. विश्वचषकासाठी श्रीलंका संघात स्थान मिळवण्यासाठी मलिंगाने हा निर्णय घेतला आहे.
श्रीलंकेच्या निवड समीतीने त्यांच्या खेळाडूंना विश्वचषकाला पात्र ठरण्यासाठी 4 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान होणाऱ्या सुपर प्रोविंशियल वनडे टूर्नामेंट या देशांतर्गत स्पर्धेत खेळण्यास सांगितले आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार मलिंगा म्हणाला, ‘मी श्रीलंका बोर्डाकडे आयपीएल खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. ते मला म्हणाले हे ठिक आहे, पण सर्व खेळाडूू ज्यांना विश्वचषक खेळायचा आहे, त्यांना प्रोविंशियल वनडे टूर्नामेंट खेळण्यासाठी परत यावे लागेल.’
मलिंगाला मुंबईने यावर्षीच्या आयपीएल लिलावात 2 कोटी या त्याच्या मुळ किमतीत संघात सामील करुन घेतले होते.
मलिंगा पुढे म्हणाला, ‘मी त्यांना सांगितले आहे की मी प्रोविंशियल वनडे टूर्नामेंट खेळेल. तसेच मी बोर्डला सांगितले आहे की मुंबई इंडियन्सला या निर्णयाबद्दल सुचीत करावे. मी माझी आयपीएलची कमाई गमवायला तयार आहे. मी जे करत आहे ते देशासाठी करत आहे.’
त्याचबरोबर मलिंगा म्हणाला, ‘मी जेव्हा मुंबई इंडियन्ससाठी उपलब्ध होईल तेव्हा मी जवळजवळ 7 ते 8 सामने मुकलेलो असू शकतो. त्यामुळे माझी वाट बघत बसण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे माझा बदली खेळाडू शोधणे योग्य आहे.’
मलिंगा हा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने 154 विकेट्स घेतल्या आहेत.
याबरोबरच मुंबईने 75 लाखांची बोली लावत संघात घेतलेल्या ऍडम मिलनेलाही दुखापतीमुळे या आयपीएल मोसमाला मुकावे लागणार आहे. त्याच्या ऐवजी मुंबईने विंडीजचा वेगवान गोलंदाज एलझारी जोसेफला संघात घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–हा दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, विश्वचषकात खेळणाऱ्या खेळाडूंसाठी आयपीएल महत्त्वाची…
–एकाच सामन्यात सारखाच पराक्रम करण्यासाठी विराट कोहली, सुरेश रैनामध्ये चुरस
–उद्यापासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या आठ संघाचे हे आहेत कर्णधार…