चेन्नई सुपर किंग्जने गुरुवारी (३० सप्टेंबर) सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सहा विकेट्स राखून विजय मिळवला आहे. या विजयासह चेन्नई संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्जने खूपच निराशाजनक प्रदर्शन केले होते आणि संघ प्लेऑफपर्यंत पोहचू शकला नव्हता. हैदराबादविरुद्ध विजय मिळवून प्ले ऑफमध्ये स्थान पक्के केल्यानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी म्हटला आहे की, आम्ही मागच्या हंगामात चाहत्यांना मजबूत वापसीचे वचन दिले होते, जे यावेळी पूर्ण केले आहे.
धोनीने पाळला शब्द
हैदराबादविरुद्ध सहा विकेट्सने विजय मिळवल्यानंतर सीएसके कर्णधार धोनीने म्हटले आहे की, “हे खूप महत्वाचे आहे, कारण मागच्या वेळी आम्ही म्हटले होते की, आम्ही मजबूत वापसी करू इच्छित आहोत. आम्ही त्याच्यासाठी ओळखले जातो आणि खूप काही साध्य करायचे होते. तुम्ही नेहमी जिंकत नाही आणि मागच्या वेळी खूप गोष्टी आमच्या बाजूने घडल्या नव्हत्या. हे महत्वाचे आहे की, आम्ही कारणे सांगितली नाही पाहिजेत आणि यावर्षी आम्ही तसे केले आहे.”
धोनी पुढे म्हणाला की, “खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले आणि त्यांनी खेळाच्या प्रत्येक विभागाला संतुलनात ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे. यासाठी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला श्रेय मिळाले पाहिजे.”
सामना सुरू होण्यापूर्वी धोनीने सांगितले होते की, खेळपट्टी मागच्या सामन्यापेक्षा वेगळी आहे. सामना संपल्यानंतर तो याबाबत म्हणाला की, “खेळपट्टीवर उसळी वेगळी होती. गोलंदाजांनी चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ज्यावेळी टप्पा खोलवर ठेवला तेव्हा त्यांच्या चेंडूवर धावा गेल्या. पण नंतर त्यांनी चांगले संतुलन बनवले. मी गोलंदाजांना सांगितले की, आजच्या खेळात परिस्थितीचा फायदा घेण्याची गरज आहे. एखाद्या फलंदाजाचा जम बसल्यावर चेंडू बॅटवर येऊ लागले.”
विजयासह चेन्नई प्ले ऑफ्समध्ये
दरम्यान सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत सात विकेट्सच्या नुकसानावर १३४ धावा केल्या होत्या आणि सीएसकेला विजयासाठी १३५ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात, सीएसकेने १९.४ षटकात आणि चार विकेट्सच्या नुकसानावर १३९ धावा केल्या आणि सामन्यात विजय मिळवला. सामन्याचा शेवट कर्णधार धोनीने अप्रतिम षटकाराने केला.