भारतीय विकेटकीपर-फलंदाज ईशान किशन याने टी२० विश्वचषक २०२६ सुरू होण्याआधीच त्याच्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याच्याच फायदा त्याला टी२० क्रमवारीत झाला आहे. ईशानने ताज्या आयसीसी टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. या यादीत आधीच भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा अव्वल स्थानावर कायम आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या फलंदाजाला मात्र नुकसान झाले असून त्यांचा अष्टपैलू मात्र पहिल्या स्थानी आला आहे.
ईशानला नुकत्याच घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत संधी मिळाली. न्यूझीलंडविरुद्धच्या त्या मालिकेत त्याने पाच पैकी चार सामने खेळले. दोन वर्षानंतर संघात परतत त्याने महत्वाच्या खेळी केल्या. यामध्ये त्याने ८, ७६, २८ आणि १०३ धावा केल्या. या महत्वपूर्ण खेळीचा त्याला खूपच फायदा झाला. त्याने ३२ स्थानांनी झेप घेतली आहे. याआधी तो ६४व्या स्थानावर होता, आता तो ५८४ अंकांसह फलंदाजांच्या यादीत ३२व्या स्थानी आला आहे.
पाकिस्तानच्या साहिबजादा फरहान याला मात्र दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. तो आता सातव्या स्थानी आला आहे.
पाकिस्तानने नुकतेच घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली. यामध्ये त्यांनी सलमान आगाच्या नेतृत्वाखाली खेळताना ऑस्ट्रेलियाला ३-० असे पराभूत केले. यामध्ये पाकिस्तानचा सलामीवीर सईम आयुबने अष्टपैलू कामगिरी केली असून तो ताज्या आयसीसी टी२० अष्टपैलूंच्या यादीत अव्वल स्थानावर आला आहे. यामुळे झिम्बाब्वेच्या सिंकदर रजाला मागे हटावे लागले.
आयुबने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ११९ धावा करताना तीन विकेटही घेतल्या. तसेच फिरकीपटू अबरार अहमदलाही दोन स्थानांचा फायदा झाला. तो गोलंदाजीत दुसऱ्या स्थानी आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने सहा विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत पहिल्या स्थानी भारताचा फिरकीपटू वरूण चक्रवर्ती आहे. या दोघांमध्ये केवळ २८ अंकांचा फरक आहे.






