इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाने रविवारी (दि. 2 एप्रिल) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजयाचं खातं उघडलं. राजस्थान या स्पर्धेत 200हून अधिक धावा करणारा पहिला संघ बनला. हे आव्हान पार करताना हैदराबादला अपयश आले आणि राजस्थानने हा सामना 72 धावांनी जिंकला. अशातच राजस्थानने सोशल मीडियावर त्यांचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मलिंगा माजी संघसहकारी मुथय्या मुरलीधरन याची खास अंदाजात प्रशंसा करताना दिसत आहे.
लसिथ मलिंगा आणि मुथय्या मुरलीधरन (Lasith Malinga And Muttiah Muralitharan) यांची गणना जगातील दिग्गज गोलंदाजांमध्ये होते. श्रीलंकेच्या या दोन्ही गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक विक्रम रचले होते, जे आजही कायम आहेत. या दोघांनीही आयपीएल कारकीर्दीची सुरुवात खेळाडू म्हणून केली होती. मात्र, सध्या दोघेही गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका निभावत आहेत. मलिंगा राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे, तर मुरलीधरन सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक आहे. रविवारी या दोन्ही प्रशिक्षकांचे संघ आमने-सामने होते. यादरम्यान सामना सुरू होण्यापूर्वीच दोन्ही दिग्गजांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
सामन्यानंतर मलिंगा जेव्हा जेवण करण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये बसला होता, तेव्हा तो त्याच्या मोबाईलवर या भेटीचा फोटो पाहत होता. त्यानंतर त्याने कॅमेऱ्यात पाहून म्हटले की, “गॉड ऑफ स्पिन 800 विकेट्स.” राजस्थानने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
विशेष म्हणजे, मुरलीधरन याने त्याच्या कसोटी कारकीर्दीत 800 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो अव्वलस्थानी आहे. तसेच, तिन्ही क्रिकेट प्रकारात त्याच्या नावावर एकूण 1347 विकेट्स आहेत.
सामन्याचा आढावा
सामन्याबाबत बोलायचं झालं, तर राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जयसवाल (54), जोस बटलर (54) आणि संजू सॅमसन (55) या तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर 5 विकेट्स गमावत 203 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने चांगलाच संघर्ष केला. त्यांना यावेळी 8 विकेट्स गमावत 131 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना राजस्थानने 72 धावांनी खिशात घातला. (legend cricketer lasith malinga praised muttiah muralitharan and called god of spin ipl 2023 see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! नो-बॉल दिल्यामुळे 22 वर्षीय अंपायरची चाकू खुपसून हत्या, सर्वत्र माजलीये खळबळ
अशी ताकद लावायची! दिग्गज विराटकडून युवा फलंदाज तिलक अन् नेहालला खास टिप्स, फोटो जोरदार व्हायरल