भारतीय संघाचा श्रीलंका दौरा नुकताच संपला. सध्या भारतीय संघ आराम करत आहे. त्यानंतर आता भारताला सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. यानंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही मालिका होणार आहे. तत्पूर्वी दिग्गज फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) यंदा खास रेकाॅर्ड करण्याची संधी आहे. कोहली 10 हजार कसोटी धावा पूर्ण करु शकतो आणि सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग या महान खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवू शकतो.
कोहलीनं आतापर्यंत 113 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 8,848 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं 29 शतके आणि 30 अर्धशतके झळकावली आहेत. कोहलीनं 7 द्विशतकही झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या म्हणजे नाबाद 254 आहे. कोहलीला 10 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 1,152 धावांची गरज आहे. जर तो हे करण्यात यशस्वी झाला तर कसोटीत 10,000 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील होईल.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. त्यानं 200 सामन्यांमध्ये 15,921 धावा केल्या आहेत. सचिननं यादरम्यान त्यानं 51 शतके आणि 68 अर्धशतके ठोकली आहेत. सचिनची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 248 आहे. रिकी पान्टिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. पान्टिंगनं 168 सामन्यात 13,378 धावा केल्या. त्यानं 41 शतके आणि 62 अर्धशतके झळकावली, तर जॅक कॅलिस तिसऱ्या क्रमांकावर आहे. कॅलिसनं 166 सामन्यात 13,289 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं 45 शतके आणि 58 अर्धशतके झळकावली.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. या मालिकेत श्रीलंकेनं भारताला 2-0 ने पछाडले. भारत आणि श्रीलंका पहिला सामना बरोबरीत सुटला होता, तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं जोरदार पुनरागमन करत भारताचा 32 धावांनी पराभव केला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं भारताला 110 धावांनी पराभूत करुन मालिका खिशात घातली. तिन्ही सामन्यात कोहली फ्लाॅप ठरला. तो एकाही सामन्यात 30 धावसंख्या देखील करु शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार यादवची अमेरिकेतही हवा! लोकप्रिय संघाकडून मिळाली खास भेट
पॅरिस ऑलिम्पिक संपताच भारतीय बॅडमिंटनपटूने उरकला साखरपुडा, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय संघात केले दुर्लक्ष? ‘या’ खेळाडूनं केला मोठा खुलासा