विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय संघाची ‘मॉर्डन भिंत’ म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्याला दोन्ही डावात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. परिणामी भारतीय संघाला कमी धावसंख्येवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका केली जात आहे. अशातच माजी भारतीय कर्णधाराने पुढाकार घेत त्याचा बचाव केला आहे.
भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी ‘स्पोर्ट्स तक’ सोबत चर्चा करताना म्हटले की,”आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की, न्यूझीलंडने कशाप्रकारे फलंदाजी केली. परिस्थिती फलंदाजी करण्यासाठी अनुकूल नव्हती आणि गोलंदाजांसाठी फायदेशीर होती. ज्याप्रकारे डेवोन कॉनवे आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन यांनी दोन्ही डावात फलंदाजी केली, त्यांचे जितके कौतुक कराल तितके कमीच आहे.तसेच रॉस टेलरने ही संथ गतीने फलंदाजी करण्यास सुरुवात केली होती.हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. त्याने देखील पुजारासारखी सुरुवात केली होती. परंतु, तुम्ही जर फक्त पुजारावर बोट उचलत असाल तर त्यात आम्ही काहीच करू शकत नाही.”
इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेत पुजारा होऊ शकतो संघाबाहेर
येत्या ४ ऑगस्ट पासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापक या मालिकेत चेतेश्वर पुजाराला प्लेइंग ईलेव्हेनच्या बाहेर ठेवण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. चेतेश्वर पुजारा सतत फ्लॉप होत असल्यामुळे, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर फलंदाजी करताना दबाव येत असल्याचे म्हटले जात आहे.
पुजाराऐवजी या संघात केएल राहुल किंवा हनुमा विहरीला संधी देण्यात येऊ शकते. तसेच कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. विराट कोहली सध्या कसोटी संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येत असतो.
महत्वाच्या बातम्या-
सतत फ्लॉप ठरत असलेल्या श्रीलंकन क्रिकेटपटूंवर चाहत्यांचा संताप; उचलले ‘हे’ मोठे पाऊल
अमेरिकेचा ‘हा’ धावपटू भविष्यातील ‘वेगाचा बादशाह’? वयाच्या १७ व्या वर्षी मोडलाय उसेन बोल्टचा विक्रम
भारतीय संघासाठी टी२० क्रिकेटच्या बाबतीत श्रीलंकेचा दौरा अगदी सोपा; पाहा ‘ही’ आकडेवारी